मुंबई : अधिक महिना आणि माघी वारीमध्ये मंदिर समितीच्या टेम्पल अॅक्टमध्ये नमूद नसलेला पलंग (राजोपचार) काढून मंदिर समितीचे सभापती असलेले जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे स्वत:च्या पदाचा दुरुपयोग केला. त्यांना सभापतीपदावरून दूर करण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वारकरी संप्रदाय पाईक संघटनेच्या शिष्टमंडळाने १ मार्च या दिवशी दिले. सोलापूरचे पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख, दैनिक निर्भीड आपले मतचे संपादक श्री. संजय वाईकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.
या वेळी वारकर्यांनी सांगितले, मंदिर समितीकडून वारंवार श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्योपचारात खंड पाडले जात आहेत. आमच्या, महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. माघी वारीमध्ये पलंग काढू नये असे आदेश १२ फेब्रुवारीला मंदिर समितीचे प्रभारी सभापती तुकाराम मुंढे यांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले होते, असे वारकर्यांनी मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिले.
वारकरी पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही मुंढे, कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, व्यवस्थापक विलास महाजन आणि नित्योपचार विभागाचे प्रमुख हनुमंत ताठे यांनी मनमानी करून १७ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पलंग काढून राजोपचार बंद केले होते. त्यामुळे मंदिर समितीच्या टेम्पल अॅक्टमधील आदेशाचा भंग केला गेला आहे. त्यामुळे मुंढे यांना सभापतीपदी क्षणभरही ठेवू नये, अशी मागणी वारकर्यांच्या शिष्टमंडळाने श्री. फडणवीस यांच्याकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश काढले आहेत. त्यामुळे मुंढे यांचे सभापतीपद जाणार, हे निश्चित झाले आहे.
या वेळी शिष्टमंडळामध्ये वारकरी संप्रदाय पाईक संघाचे ह.भ.प. राणा महाराज वासकर, उपाध्यक्ष ह.भ.प. बापुसाहेब महाराज उखळीकर, प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर, ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प रघुनाथ महाराज कबीर, ह.भ.प. भागवत महाराज हंडे आदि उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात