विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग
काशी (वाराणसी) – श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. येथील मैदागिन चौकात धर्मध्वजाचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘जय श्रीराम’च्या जयघोषात शोभायात्रेला प्रारंभ होऊन चित्तरंजन पार्क येथे समारोप करण्यात आला. या वेळी ‘इंडिया विथ विझडम्’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, ‘इंडिया विथ विझडम्’चे उपाध्यक्ष अधिवक्ता अवनीश राय, विश्व सनातन सेनेचे संस्थापक श्री. अनिलसिंह सोनू, हिंदु जागरण मंचाचे संयोजक श्री. रवि श्रीवास्तव, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्राची जुवेकर आणि सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु यांनी उपस्थितांना संबोधित केले.
लोकशाहीने एकही तेजस्वी राजा दिला नाही ! – सौ. प्राची जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
रामराज्यात प्रत्येक बाबतीत जनता सुखी होती. सध्या लोकशाहीकडे पाहिले, तर या लोकशाहीने एकही तेजस्वी राजा दिला नाही. राजकारण्यांनी समाजाची केवळ लूट केली. भारतात एकही राज्य नाही, जेथे सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. विकासाच्या नावावर समाजाला वर्षानुवर्षे मूर्ख बनवणे, ही राजकारण्यांची एक पद्धतच बनली आहे. रामराज्याशी या लोकशाहीशी तुलनाही होऊ शकत नाही. या शोभायात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रभु श्रीरामाप्रती श्रद्धा वृद्धींगत व्हावी आणि रामराज्य लवकरात लवकर यावे, यासाठी प्रभु श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना करूया.
क्षणचित्रे
१. शोभायात्रेतील जयघोष ऐकून मार्गाच्या बाजूला उभे असलेले अन्य लोकही श्रीरामाचा जयघोष करत होते.
२. ही शोभायात्रा पाहून यात सहभागी होण्याची एका वृद्ध महिलेची तीव्र इच्छा झाली. शोभायात्रेत सहभागी होण्यास तिच्या कुटुंबियांनी तिला विरोध केला. तरीही तिने शोभायात्रेत सहभाग घेतला.