छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच गुरू आणि देवतांच्या साह्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघानेही प्रयत्न करावेत, हीच हिंदूंची संघाकडून अपेक्षा आहे ! – संपादक, हिंदुजागृती
रायगड : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराकडे कानाडोळा करून भारताचा विकास केला जाऊ शकत नाही,’ असं सांगतानाच ‘अन्यायाविरोधात लढणारे शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र आहेत,’ असं गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढले.
शिवपुण्यतिथी निमित्त रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. ‘जोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता आहे. शिवाजी घरोघर असण्याची आवश्यकता आहे आणि तो माझ्या घरी असला पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे,’ असं भागवत यांनी सांगितलं.
‘छत्रपती शिवाजी महाराज हे मार्गदर्शक पुस्तक आहेत. त्यांनी कधीच भेदभाव केला नाही, हा अमूकची पूजा करतो, तो तमूकची पूजा करतो म्हणून भेद केला नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाजी महाराजांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. राज्यव्यवहाराची भाषा बदलली. भारतीय भाषांमध्येच भारताचे व्यवहार झाले पाहिजेत, असंही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांची कन्या, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स