-
आग्रा येथील विहिंपचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येचे प्रकरण
-
समाजवादी शासनाच्या पोलिसांकडून भाजपच्या नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची सिद्धता
आग्रा (उत्तरप्रदेश) : येथील विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थित केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया, भाजपचे खासदार बाबू लाल, विश्व हिंदू परिषदेचे महासचिव सुरेंद्र जैन, स्थानिक भाजपचे आमदार जगन प्रसाद गर्ग आदी नेत्यांकडून महौर यांच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी धर्मांधांच्या विरोधात शेवटची (निर्णायक) लढाई करण्याची चेतावणी देण्यात आल्याचे वृत्त दैनिक जनसत्ताच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी समाजवादी पक्ष शासनाची पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून त्यांनी या हिंदु नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची सिद्धता केली आहे. महौर यांची काही दिवसांपूर्वी शाहरूख, इम्तियाज, आबिद आणि राजा यांच्याकडून हत्या करण्यात आली होती.
काही नेत्यांनी भाषणात व्यक्त केलेले मनोगत
१. आपल्याला शक्तीशाली बनले पाहिजे. आम्ही संघर्ष चालू केला नाही, तर आज आम्ही अरुणला मुकलो, उद्या दुसर्या कोणाला मुकावे लागेल. दुसरा जाण्यापूर्वी ही हत्या करणारेच जातील, अशा प्रकारची शक्ती आम्हाला दाखवावी लागेल. – रामशंकर कथेरिया, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
२. आमची परीक्षा घेऊ नका. आम्ही समाजाचा अपमान सहन करणार नाही. आम्हाला अशांती नको आहे; परंतु तुम्हाला हिंदूंची परीक्षा घ्यायची असेल, तर भिडण्याचा दिनांक ठरवून टाका. – खासदार बाबू लाल, भाजप
३. तुम्हाला गोळ्या चालवाव्या लागतील, बंदुका उचलाव्या लागतील, सुरेही चालवावे लागतील. वर्ष २०१७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, आताच तुम्हाला शक्ती दाखवावी लागेल. – जगन प्रसाद, आमदार, भाजप
४. जर तुम्हाला भारतात रहायचे असेल, तर रहीम आणि रहमान यांच्यासारखे रहा. अकबर आणि बाबर बनण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तुमची घरे उद्ध्वस्त करून टाकू. – जगमोहन चाहर, जिल्हा संयोजक, बजरंग दल
५. ही शांत बसण्याची वेळ नाही. या हत्यारांना शोधून आणा आणि सूड घ्या. अनेक जण विचारत आहेत की, तुम्ही काही करत का नाही ? एकदा लोक एकत्र आले, तर कोणताही प्रश्न उपस्थित होणार नाही. रामजन्मभूमी आणि मुजफ्फरनगरच्या वेळी पक्ष नव्हता; परंतु तेराव्याच्या पूर्वी सूड घेण्यात येईल, हे ठरले आहे. – अशोक लवानिया, जिल्हा सचिव, विहिंप
६. विश्व हिंदु परिषदेचे महासचिव सुरेंद्र जैन यांनीही आग्य्राचे मुजफ्फरनगर न करण्याची चेतावणी प्रशासनाला दिली.
कथेरिया यांच्या विरोधात देहलीत मुसलमान संघटनांचे आंदोलन
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी आग्रा येथे केलेल्या विधानांवरून देहलीत मुसलमान संघटनांनी आंदोलन केले.
मी सूड घेण्याचे विधान केलेले नाही ! – कथेरिया यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणी कथेेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कथेरिया म्हणाले की, मी असे कोणतेही विधान केलेले नाही. एका इंग्रजी दैनिकात जसे प्रसिद्ध झाले आहे, तसे विधान मी केलेले नाही. मी अधिवक्त्यांचा सल्ला घेऊन त्यांना नोटीस बजावणार आहे. मी केवळ इतकेच म्हणालो की, हिंदु समाजाला स्वरक्षणासाठी संघटित झाले पाहिजे. मी कोणाचाही सूड घेण्याचे किंवा कोणाचे नाव घेतले नाही. दोषींना फाशी देण्याची मी मागणी केली. उलट मी पोलिसांचे अभिनंदन करतो की, त्यांनी आरोपींना अटक केली. भाजपचा कोणताही मंत्री ज्यामुळे अशांती निर्माण होईल, असे बोलणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात