Menu Close

‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये देवतांचे अश्‍लाघ्य विडंबन !

हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच श्रद्धास्थानांचे उघडपणे विडंबन केले जाते, हे सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदू यांना लज्जास्पद ! असे विडंबन करण्याचे कोणी धाडस करणार नाही, अशी पत हिंदू कधी निर्माण करणार ? याासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

टीप : या चित्राद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून केवळ विडंबन काय केले आहे, ते समजावे यासाठी चित्र प्रकाशित करत आहोत. – संपादक

‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेत्यांना ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या ठिकाणी दाखवून अश्‍लाघ्य विडंबन !

मुंबई : ‘ओ माय गॉड’, ‘पिके’, ‘पद्मावत’ आदी चित्रपटांनंतर आता ‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश या हिंदूंच्या उच्च देवतांना मॉडर्न नटांच्या ठिकाणी दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अश्‍लाघ्य प्रकार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश भट यांनी केले असून चित्रपटाचे निर्माते चिंतन राणा हे आहेत. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्यांच्याकडून हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारे चित्रपट, नाटके, विज्ञापने सादर केली जातात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येत्या ११ मे या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटात पोस्टरवर (भित्तीपत्रकावर) अभिनेत्यांना देवतांच्या रूपात दाखवलेले छायाचित्र दाखवण्यात आले आहे. सामाजिक संकेतस्थळावर अधिकृतरित्या ठेवण्यात आलेल्या ‘पोस्ट’मधून हा प्रकार स्पष्ट होत आहे. (सध्या जो तो ऊठसूट चित्रपट, नाटक, विज्ञापने, लेखन आदी माध्यमातून हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करून ‘मार्केटिंग’ करायचे, ही व्यवसायिक पद्धत झाली आहे. धर्माभिमानाच्या अभावामुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांची अवहेलना होत आहे. हिंदूंनी विरोध केला की लगेच त्यांना धर्मांध ठरवणे, ही पुरोगाम्यांची नेहमीची पद्धत झाली आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

अभिनेते करणसिंह ग्रोव्हर यांनी ‘अडचणीच्या वेळी भगवंताला हाक मारल्यावर भगवंत कसे साहाय्य करतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आहे’, असे म्हटले आहे; मात्र हे सर्व विनोदी पद्धतीने दाखवले आहे. या चित्रपटाचा अधिकृत ‘ट्रेलर’ (विज्ञापनस्वरूपात आगामी चित्रपटातील दाखवली जाणारी काही दृश्ये) अद्याप प्रदर्शित व्हायचा असला, तरी चित्रपटाचे प्रदर्शित झाले पोस्टर, तसेच निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधून चित्रपटात देवतांचे मानवीकरण करून त्यांना मॉडर्न रूपात दाखवण्यात आले आहे.

देवतांच्या अवमानाच्या विरोधात धर्मरक्षक महामंचाकडून पोलीस आयुक्त आणि चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांना निवेदन

मुंबई येथील धर्मरक्षक महामंचाचे अध्यक्ष श्री. रमेश जोशी यांनी ‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या चित्रपटाच्या पोस्टरच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे निवेदन पोलीस आयुक्त आणि चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांना पाठवले आहे. या निवेदनामध्ये ‘ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या ठिकाणी मॉडर्न नट दाखवणे, हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. त्यामुळे चित्रपटाचे पोस्टर त्वरित पालटण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तत्परतेने वैध मार्गाने कृती करणारे धर्मरक्षक महामंचाचे श्री. रमेश जोशी यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी हा आदर्श घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

देवतांचा अवमान कदापि सहन करणार नाही ! – रमेश जोशी, अध्यक्ष, धर्मरक्षक महामंच

हिंदु धर्माची हानी होत असेल, तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. देवतांचा अवमान कदापि सहन करणार नाही. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आंदोलन करून लोकशाही मार्गाने या चित्रपटाला विरोध करू. आमची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत असेल.

संदर्भ : सनातन प्रभात

चित्रपट परिनिरीक्षण मंडळ, पोलीस, प्रशासन, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये ! – सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हल्ली चित्रपटांमधून हिंदूंच्या देवतांचे विडंबन करा, इतिहासाचे विकृतीकरण करा, हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळा आणि प्रसिद्धी मिळवा, हा प्रसिद्धी स्टंट झाला आहे. ‘पद्मावत’ चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाची अवहेलना करून रजपुतांसह लक्षावधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापूर्वी ‘पिके’, ‘ओ माय गॉड’ या चित्रपटांमधून हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्यात आला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार यापुढे कदापि सहन केला जाणार नाही. ‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये इतक्या प्रमाणात देवतांचे विडंबन दिसत असेल, तर चित्रपटात किती असेल, हे सांगण्याची आवश्यकता नाही. या चित्रपटाची एकूणच संकल्पना हिंदूंच्या देवतांना विनोदात्मक पद्धतीने दाखवणे आणि त्यांचे विडंबन करणे, ही आहे. या गोष्टीचा हिंदु जनजागृती समितीकडून आम्ही तीव्र निषेध करत आहोत.

या चित्रपटाच्या विरोधात महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत आम्ही तक्रार प्रविष्ट करणार आहोत. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी राज्यभर आंदोलने करणार आहोत. निर्मात्यांनी वेळीच या गोष्टीची नोंद घ्यावी आणि चित्रपटातील सर्व विडंबनात्मक भाग वगळावा. हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी चर्चा करून त्यांना हा चित्रपट दाखवल्याविना प्रदर्शित करू नये. चित्रपट परिनिरीक्षण मंडळ अन्य धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या विरोधातील दृश्यांना कात्री लावते. आजपर्यंत हिंदूंच्या देवता, संत, राष्ट्रपुरुष, इतिहास यांची अवहेलना अनेक वेळा करण्यात आली; मात्र चित्रपट परिनिरीक्षण मंडळानेही त्याची कधी नोंद घेतल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना तीव्र आहेत. चित्रपट परिनिरीक्षण मंडळ, पोलीस, प्रशासन, निर्माते, दिग्दर्शक या सर्वांनी हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा हिंदू रस्त्यावर उतरून वैध मार्गाने विरोध केल्याविना रहाणार नाहीत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *