हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी प्रभावी ठरणार्या विविध उपक्रमांत सहभागी व्हा : श्री. सुनील घनवट यांचे उद्योजकांना आवाहन
सावंतवाडी : हिंदु समाज जातीभेद विसरून हिंदु म्हणून जागृत झाला, तरच धर्मरक्षणासाठी कृतीशील होऊ शकतो. यासाठी हिंदु जनजागृती समिती राबवत असलेल्या हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी प्रभावी ठरणार्या उपक्रमांचे आयोजन कसे करायचे, याविषयी दिशादर्शन केले जाते. हिंदूंमधील धर्माभिमानाचा अभाव, हेच हिंदूंच्या अधःपतनाचे मुख्य कारण आहे. मुसलमानांना मदरशांत आणि ख्रिस्त्यांना चर्चमध्ये धर्मशिक्षण मिळते, तसे हिंदूंना मिळत नाही. परिणामी त्यांच्यामध्ये धर्माभिमान नाही. यासाठीच हिंदु जनजागृती समिती विनामूल्य धर्मशिक्षणवर्ग आयोजित करते. या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धर्माभिमानी, उद्योजक, अर्पणदाते, हिंदु धर्मजागृती सभांसाठी पुढाकार घेऊन कार्य करणारे धर्मप्रेमी अशा विविध स्तरांवर कार्य करणार्या धर्माभिमानी हिंदूंसाठी देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी आदी एकूण ८ ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. घनवट यांनी राष्ट्र आणि धर्म यांची सद्यःस्थिती, हिंदूंची धर्माप्रती असलेली उदासीनता, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि जनता यांनी करावयाचे प्रयत्न यांविषयी मार्गदर्शन केले.
या वेळी श्री. घनवट म्हणाले, सद्य:स्थितीत तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकशाहीमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची परम अधोगती झाली आहे. हिंदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर उपाय म्हणून भारतात हिंदु धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन करणेे आवश्यक आहे. यासाठीच हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण या उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी हिंदूसंघटनाचे कार्य करत आहे. या धर्मकार्यात सर्व जण स्वक्षमतेनुसार अधिकाधिक वेळ देऊन सहभागी झाल्यास धर्मासाठी (म्हणजेच ईश्वरासाठी) तन, मन आणि धन यांचा त्याग होईल अन् आपली आध्यात्मिक प्रगतीही होईल. धर्मशिक्षणवर्गात हिंदु धर्माची श्रेष्ठता, ईश्वरप्राप्ती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी साधना म्हणून कृती कशा कराव्यात, याविषयी कृतीशील मार्गदर्शन, तसेच धर्मरक्षणाच्या कार्यातील आगामी कृतींचे नियोजन एकत्रितपणे करता येते.
या वेळी श्री. राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख करून दिली.