चेन्नई : येथील चेतपत परिसरात असलेल्या शंकरालयम्मध्ये १ एप्रिल या दिवशी ‘जनकल्याण’ या संघटनेच्या वतीने कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली वहाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी भजने म्हणण्यात आली. तसेच विष्णुसहस्त्रनामाचे पठण करण्यात आले. त्यानंतर शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्या भक्तांनी त्यांना आलेल्या अनुभूतींचे कथन केले. या अनुभूतींच्या माध्यमातून स्वामीजींना तळागळांतील लोकांविषयी असलेले प्रेम आणि आपुलकी यांचे दर्शन झाले. या लोकांना हिंदु धर्मामध्ये सामावून घेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही या वेळी लक्षात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. प्रभाकरन् या कार्यक्रमात सहभागी झाले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेल्या श्रद्धांजली संदेशाचे या वेळी वाचन करण्यात आले. शंकराचार्य यांच्या विषयीचे लिखाण प्रसिद्ध केलेल्या सनातन प्रभात विशेषांकाच्या प्रती ‘जनकल्याण’चे श्री. नागार्जुन आणि श्री. सुब्रह्मण्यम् यांना देण्यात आल्या. या वेळी अनुमाने २०० भक्त उपस्थित होते.