- स्वार्थी राजकीय पक्ष नाही, तर धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे सर्वस्वाचा त्याग करणारे धर्माभिमानीच खरे कार्य करू शकतात !
- डॉ. तोगाडिया यांनी यापूर्वीच हे का सांगितले नाही ? आणि विहिंपने भाजपला वेळीच रोखले का नाही ?, असे प्रश्न हिंदूंच्या मनात येतात !
नवी देहली : भाजपने मते मिळवण्यासाठी हिंदु आणि भगवान श्रीराम यांचा वापर केला, असा आरोप विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे. ‘विकास आणि सुरक्षा यांत अयशस्वी ठरलेला भाजप पुन्हा हिंदूंच्या मतांसाठी राममंदिराचे आंदोलन चालू करून हिंदूंना मरण्यासाठी वार्यावर सोडेल’, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. तोगाडिया यांनी केलेली विधाने
१. सत्ताधारी भाजपमधील लोक अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्नावर न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहाण्यास सांगतात. ही चक्क कोलांटउडी आहे. यातून अयोध्येत बाबरी मशीद बनवून स्वतःला धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न तर नाही, अशी शंका येते. अशी शंका गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूंच्या मनात येत आहे आणि गेल्या ४ वर्षांत ती विशेष करून येत आहे.
२. वर्ष १९८९ मध्ये भाजपच्या कार्यकारिणीने प्रस्ताव संमत केला होता की, भाजपचे देशात बहुमताचे सरकार स्थापन झाल्यावर अयोध्येत भव्य राममंदिर बांधले जाण्यासाठी कायदा बनवला जाईल. त्या वेळीही न्यायालयात याविषयी खटला चालूच होता.
३. संघ सांगतो की, व्यक्तीपेक्षा संघटना मोठी असते, तर मग संघाचा पक्ष असणारा भाजप स्वतःच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याऐवजी एका सत्ताधारी व्यक्तीच्या समोर मौन का होतो ?
४. आता हिंदूंच्या लक्षात आले आहे की, राममंदिराच्या नावाखाली आंदोलन करणे, हे केवळ त्यांच्या मतांसाठीचे षड्यंत्र होते.
५. भाजप म्हणतो की, त्यांना हिंदुत्वामुळे नाही, तर विकासाच्या सूत्रामुळे मते मिळाली; परंतु गेल्या ४ वर्षांत विकासासाठी यांनी काय केले ?, म्हणजे विकासही नाही आणि राममंदिरही नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात