श्री राजराजेश्वरी मंदिर न्यासाच्या पदाधिकार्यांचे स्तुत्य निर्णयासाठी अभिनंदन ! देशातील प्रत्येक मंदिर न्यासाने असा निर्णय घेणे आवश्यक आहे !
बेंगळुरू : येथील आर्.आर्. नगरस्थित श्री राजराजेश्वरी मंदिरामध्ये येणार्या भाविकांच्या वेशभूषांसाठी नियम लागू करण्यात आले आहेत. भाविकांना पारंपरिक वेश परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात महिलांना खांदे उघडे ठेवण्यात येणारे सदरे, जीन्स आणि तोकडे स्कर्ट घालून येण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे, तसेच पुरुषांसाठीही नियम लागू केले आहेत. पुुरुषांना धोतर किंवा पॅन्ट, तसेच महिलांना साडी आणि ओढणीसह चुडीदार घालून दर्शन घेता येणार आहे. १८ वर्षांखालील मुलींना संपूर्ण शरीर झाकले जाईल, असा पारंपरिक वेश परिधान करून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त केस मोकळे सोडलेल्या महिलांना प्रवेश दिला जाणार नसून ते बांधलेले असणे आवश्यक असणार आहे. या संदर्भात मंदिराबाहेर फलक लावण्यात आला आहे.
१. मंदिर न्यासाचे सदस्य हयग्रीव ए. यांनी म्हटले की, हे नियम नवीन नाहीत. गेल्या १-२ वर्षांपासून ते लागू करण्यात आले आहेत. अनेक युवक-युवती तोकडे कपडे घालून मंदिरात दर्शनासाठी येत असतात. आम्ही त्यांना सांगितले की, ‘तुम्ही भारतीय संस्कृतीकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे कपडे घालून मंदिरात यावे.’ असे असले, तरी अद्याप आम्ही कोणालाही मंदिरात येण्यापासून रोखलेले नाही.
२. स्थानिक जे.पी. नगरमध्ये रहाणारे नेथरा कश्यप यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, मंदिर पूजा करण्याचे स्थान आहे. कोणी तुमच्यावर टीका करण्यापूर्वीच तुम्ही योग्य आचरण का करत नाही ? वेश परिधान करण्यासंदर्भात अन्य धर्मियांमध्येही नियम आहेत. असाच नियम एखाद्या मंदिराकडून बनवण्यात येत आहे, तर त्यात चुकीचे काय ?
३. अभियंता धनंजय पी. यांनी टीका करतांना म्हटले की, हा अनावश्यक निर्णय आहे. सध्याच्या काळात पुरुष आणि महिला यांना बरोबरीचे अधिकार आहेत. देवाच्या दृष्टीने सर्व एकच आहेत, तर कोणी काय घालावे, याला विशेष महत्त्व रहात नाही. हा भक्तीचा विषय आहे. (येथे पुरुष आणि महिला यांच्या अधिकाराचा प्रश्न येत नसून सात्त्विक वेशभूषा परिधान केल्यावर मंदिरातील चैतन्य आणि सात्त्विकता ग्रहण करता येते अन् ती टिकून रहाण्यास साहाय्य होते. हे समजण्यासाठी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदु जनजागृती समितीच्या मागणीचा परिणाम
काही मासांपूर्वी हिंदु जनजागृती समितीप्रणीत ‘रणरागिणी’ या महिला शाखेच्या पदाधिकार्यांनी मंदिराच्या पू. स्वामीजींना भेटून देवस्थानात येणार्या भक्तांना मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यासाठीचे निवेदन दिले होते. आता मंदिर न्यासाने या संदर्भात मंदिराबाहेर फलक लावला आहे. त्यावर रणरागिणी शाखेच्या बेंगळुरू येथील सौ. भव्या गौडा यांनी सांगितले, ‘‘मंदिर न्यासाचा हा स्तुत्य निर्णय आहे. याचे आम्ही स्वागत करतो. यामुळे मंदिराच्या पावित्र्याच्या रक्षणासह हिंदु संस्कृतीचे संवर्धन होईल. हे नियम सर्व मंदिरांना लागू करावेत.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात