बेंगळुरू येथे हिंदुत्वनिष्ठ पत्रकार, अधिवक्ता, आधुनिक वैद्य, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच हितचिंतक यांना मार्गदर्शन
बेंगळुरू : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी कर्नाटक राज्यातील हुब्बळ्ळी, धारवाड, राणेबेन्नुर, लक्ष्मेश्वर, गदग, बादामी, गुळेदगुड्डा, कोलार, मानवी, निडगुंदी, रायचूर, गजेंद्रगड आणि बेळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ पत्रकार, अधिवक्ता, आधुनिक वैद्य, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच हितचिंतक यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाविषयी मार्गदर्शन केले. या वेळी समितीचे श्री. अंजेश कणगलेकर उपस्थित होते.
१. हिंदूंवर होत असलेले आघात जनसामान्यांसमोर ठेवण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू, असे हिंदुत्वनिष्ठ पत्रकारांनी या वेळी सांगितले.
२. हिंदु कार्यकर्त्यांना कायद्याचे ज्ञान अल्प असल्यामुळे कार्य करतांना त्यांचा आत्मविश्वास अल्प पडतो. त्यांना कायद्याचे शिक्षण देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू, असे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी सांगितले.
३. विविध ठिकाणी मार्गदर्शनानंतर सर्वांनी उत्स्फूर्तपणे शंकांचे निरसन करून घेतले.
४. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी ‘अधिवक्त्यांची वेगळी बैठक, तसेच साधना आणि धर्मशिक्षण यांविषयी शिबीर आयोजित करू’, असे सांगितले.
५. या कार्यक्रमांनंतर अधिवक्ता आणि हितचिंतक यांनी गोवा येथील आश्रमात होणारी शिबिरे अन् हिंदू अधिवेशन यांना उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.
६. संपर्क दौर्याच्या काळात श्री. शिंदे यांनी गुळेदगुड्डा येथील श्री जगन्नाथ मंदिर, लक्ष्मेश्वर येथील प्राचीन सोमेश्वर मंदिर, बादामी येथील श्री बनशंकरी देवस्थान, तसेच मंत्रालय येथील श्री राघवेंद्रस्वामी यांची समाधी आदींचे दर्शन घेतले. या सर्व ठिकाणी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना केली.
या दौर्याच्या अंतर्गत श्री. रमेश शिंदे यांनी राणेबेन्नूर, गदग, जमखंडी आणि विजयपूर येथे सक्रीय अधिवक्ता आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे कार्यकर्ते यांना ‘हिंदु राष्ट्र आणि त्यासाठी आपले योगदान’ याविषयी मार्गदर्शन केले.
निडगुंदी, विजयपूर येथे प्रतिष्ठितांसह ग्रामस्थांना मार्गदर्शन
निडगुंदी, विजयपूर (कर्नाटक) : येथे श्री. रमेश शिंदे यांनी ‘भारताचा वैभवशाली प्राचीन इतिहास, सध्याचा भारत आणि त्यातील समस्या अन् हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी पंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शिक्षक, विद्यार्थी आणि महिला समवेत असे ११० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
२. माजी सैनिकांकडून श्री. रमेश शिंदे यांना चांदीचे ब्रेसलेट भेट देण्यात आले.
३. मार्गदर्शन संपल्यानंतर आयोजकांनी पुढील कार्य करण्याविषयी श्री. शिंदे यांच्याशी स्वत:हून चर्चा केली.
४. या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांसाठी शिबीर, धर्मशिक्षणवर्ग, स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग नियमितपणे चालू करण्याची मागणी करण्यात आली.
छत्रेवाडा येथे हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांना मार्गदर्शन
स्वार्थासाठी हिंदूंमध्ये मतभेद निर्माण करण्याचे षड्यंत्र चालू आहे ! – रमेश शिंदे
छत्रेवाडा, बेळगाव : द्रष्ट्या संतांनी सांगितल्याप्रमाणे येणारा काळ अतिशय बिकट असून सर्वांना तीव्र आपत्काळाला सामोरे जावे लागणार आहे. असे असतांना स्वार्थासाठी हिंदूंमध्ये फूट पाडून मतभेद निर्माण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. याकरता हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना संघटित करणे आवश्यक आहे; मात्र यासाठी ईश्वरी अधिष्ठान आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. येथे हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, हितचिंतक आणि सनातन प्रभातचे वाचक यांच्यासाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री. रमेश शिंदे बोलत होते. या मार्गदर्शनाला ३० हून अधिक जण उपस्थित होते.
छत्रेवाडा येथे श्री. रमेश शिंदे यांची हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांशी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ‘हिंदूना संघटित करण्यात येणार्या अडचणी आणि त्यावर उपाय’ यांविषयी चर्चा झाली.