हिंदूंनी सभा कुठे, कधी आणि कशी घ्यावी, हे पोलीस प्रशासनाने सांगायला हा पाकिस्तान आहे का ? – मा. रवींद्रजी वायकर यांचे खडे बोल
चिपळूण : जिल्हा पोलीस यंत्रणेकडून हिंदु धर्मजागृती सभेच्या अनुमतीविषयी घेतलेल्या आडमुठ्या धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत हिंदूंनी सभा कुठे, कधी आणि कशी घ्यावी, हे पोलीस प्रशासनाने सांगायला हा काय पाकिस्तान आहे का ? अशी तीव्र प्रतिक्रिया पालकमंत्री मा. रवींद्रजी वायकर यांनी प्रत्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलतांना व्यक्त केली.
पोलीस यंत्रणेकडून अकारण हिंदु धर्मजागृती सभेच्या अनुमती मिळण्यासंदर्भात दिरंगाईच्या धोरणाविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेना चिपळूण-संगमेश्वर तालुक्याचे आमदार श्री. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख श्री. सचिन कदम, तसेच तालुकाप्रमुख शशिकांत शिंदे यांच्या भेटी घेऊन चर्चा करण्यात आली होती. या चर्चेनंतर गुहागर नगर पंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचारसभेकरता जिल्हा दौर्यावर येणार्या पालकमंत्री रवींद्रजी वायकर यांच्याशी चर्चा करण्याविषयी शिवसेना पदाधिकारी यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सुरेश शिंदे, विनोद गादीकर, सनातनचे श्री केशव अष्टेकर, श्री. महेंद्र चाळके हेमंत चाळके चंद्रशेखर गुडेकर हे उपस्थित होते. आणि शिवसेनेचे श्री. सचिन कदम, प्रतापराव शिंदे, नगरसेवक शशिकांत मोदी पंचायत समिती गटनेते राकेश शिंदे यांनी पालकमंत्री श्री. रवींद्र वायकर यांच्याशी चर्चा केली.
या वेळी चर्चा करतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. सचिन कदम यांनी ‘पोलीसयंत्रणेकडून हिंदु जनजागृती समितीला ही धर्मजागृती सभा सभागृहात घेण्याविषयी दबाव आणला जात आहे’, याविषयी खेद व्यक्त केला. तालुकाप्रमुख श्री. शशिकांत शिंदे यांनी २६ मार्चची सभा शेवटचे २ घंटे असतांना रहित करण्यास भाग पाडले होते. सर्वतोपरी आर्थिक हानी सोसूनही समितीने पोलीस प्रशासनाला साहाय्य केले, तरीही १६ एप्रिलच्या सभेला जिल्हा पोलीसयंत्रणा अनुमती देण्यास दिरंगाई करत आहे’, याविषयी संताप व्यक्त केला. या चर्चेची गंभीर दखल घेत पालकमंत्री मा. रवींद्रजी वायकर यांनी त्वरित जिल्हा पोलीस अधीक्षक यांना संपर्क केला आणि सभेला अनुमती देण्यास दिरंगाई का केली जात आहे याविषयी कारणे विचारली.
या वेळी पोलीस अधीक्षकांकडून जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या पुतळा विटंबनेच्या घटना आणि त्यावरून देशभर पसरलेला असंतोषाचे वातावरण असल्याची कारणे सांगितली. त्यानंतर पालकमंत्री श्री. वायकर यांनी सांगितले की, कायदा सुव्यवस्था राखणे, हे पोलिसांचे कामच आहे; मात्र त्याकरता जनतेला कार्यक्रम घेण्यापासून रोखता येणार नाही. या सभेला त्वरित अनुमती देण्यात यावी.
१. प्रतिवर्षी होत असणार्या हिंदु जनजागृती समितीच्या सभाना अनुमती देण्यात अडचणी नको ! – आमदार सदानंद चव्हाण
हिंदु धर्मजागृती सभेच्या अनुमतीसाठी शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे सभेसाठी अनुमती देण्यात झालेल्या दिरंगाईविषयी विचारणा केली. त्या वेळी पोलीस अधीक्षकांनी या सभेच्या आयोजकांचा भिडेगुरुजी यांच्याशी संबंध आहे का ? अशी विचारणा केली त्यावर पू. भिडेगुरुजी यांची संघटना वेगळी असून हिंदु जनजागृती समिती यांच्या सभा प्रतिवर्षी असतात. त्यांना अनुमती देण्यात अडचण येऊ नये, असे पहा असे सांगितले. यावर पोलीस अधीक्षकांनी मी यात लक्ष घालतो, असे सांगितले.
२. सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, हा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आम्हाला आदेश ! – चिपळूण शिवसेना तालुकाप्रमुख शशिकांत शिंदे
आगामी धर्मरक्षणाच्या कार्यात सनातन संस्थेसारख्या धार्मिक संघटनांसमवेत शिवसेनेला कार्य करावे लागणार आहे. त्यामुळे केवळ राजकीय कामे करत राहू नका. त्याच्याच जोडीला सनातन संस्थेसारख्या धार्मिक संघटनांना वेळोवेळी साहाय्य करा. उद्याच्या संघर्षाच्या काळात शिवसेनेलाही जातीयवादी म्हणून हिणवणारे आहेत. त्यांच्याशी दोन हात करतांना आपल्यासमवेत कोण ? हा प्रश्न त्या वेळी पडू नये याकरता या धार्मिक संघटनांना समवेत घेऊन कार्य करा, असा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आम्हाला आदेश आहे.