गुंड टोळीवर कारवाई करूनही हिंदूंना असुरक्षित वाटत असेल, तर सरकारने त्याकडे लक्ष द्यायला हवे आणि जनतेला पूर्ण सुरक्षित वाटेल, अशी स्थिती निर्माण करायला हवी !
लक्ष्मणपुरी : वर्ष २०१४ मध्ये उत्तरप्रदेशच्या कैराना येथे कुख्यात मुकीम टोळीकडून व्यापारी शिवकुमार सिंघल (वय ४३ वर्षे) आणि राजेंद्रकुमार गर्ग (वय ४३ वर्षे) यांची १० लाख रुपयांची खंडणी न दिल्याने हत्या करण्यात आली होती. त्यांना ८ मास सुरक्षा पुरवण्यात आली होती; मात्र सुरक्षा काढून घेतल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर त्यांच्या परिवाराने कैराना सोडून मुझफ्फरनगर येथे वसण्याचा निर्णय घेतला. (तत्कालिन समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात हिंदूंच्या झालेल्या या दयनीय स्थितीविषयी एकाही निधर्मीवाद्याने कधी आवाज उठवला नाही, हे लक्षात घ्या ! हे निधर्मीवादी अल्पसंख्यांकांसाठी नेहमीच गळे काढत असतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर पोलिसांनी मुकीम टोळीच्या नौशाद, सरवर, शब्बीर, अकबर, वसीम आणि शमील या ६ गुंडांना चकमकीत ठार केले, तर अन्य जणांना कारागृहात डांबले. मुकीमही हरियाणा येथील कारागृहात बंद आहे. आता ही टोळी उद्ध्वस्त झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले, तरी गर्ग आणि सिंघल कुटुंबीय पुन्हा कैरानामध्ये येण्यास सिद्ध नाहीत. त्यांना अजुनही कैराना असुरक्षित आहे, असे वाटते.
गर्ग यांचे भाऊ मुकेश म्हणाले की, कैरानाची स्थिती पालटली आहे, असे म्हटले जात असले, तरी वस्तूस्थिती तशी नाही. अजुनही तेथील हिंदू असुरक्षितच आहेत. हिंसेच्या भीतीने व्यापारी सायंकाळी ६ नंतर घरातून बाहेर पडत नाहीत. गुंड आता शामली जिल्ह्यातून कारवाया करत आहेत.
सिंघल यांचे भाऊ मनोज कुमार यांनी म्हटले की, आम्ही कैराना येथील पूर्वजांची मालमत्ता विकणार, म्हणजे तेथे परतण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात