हिंदु एलुची पेरावई’च्या वतीने त्रिची (तमिळनाडू) येथे हिंदू संमेलन
त्रिची (तमिळनाडू) – हिंदु धर्मावर विविध प्रकारचे आघात होत आहेत. हिंदु धर्माची विटंबना चालू आहे. त्यामुळे प्रतिकार करणे, हाच हिंदु धर्मावरील आघात रोखण्याचा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन श्री श्री श्री शेंदलंगरा जीर स्वामिगल यांनी येथील हिंदू संमेलनात केले.
त्रिची (तमिळनाडू) येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्यातील एकता अन् बंधुता विकसित करण्यासाठी येथील ‘हिंदु एलुची पेरावई’ (हिंदु जागृती संघटना) या संघटनेच्या वतीने प्रथमच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु धर्माभिमानी नेते यांचे संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाला विश्व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी डॉ. प्राचीदीदी, साध्वी सरलादीदी, अखिल भारतीय हिंदु महासभेचे नेते श्री. चंद्रप्रकाश कौशिक, श्री. वीरेशकुमार त्यागी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पाला संतोषकुमार यांनी केले.
संमेलनाचे अध्यक्ष श्री श्री शेंदलंगरा जीर स्वामिगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या संमेलनाला अखिल भारत हिंदु महासभा, तमिळनाडू शिवसेना, विवेकानंद सेवा समिती, रुद्र सेना, भारतीय जनता पक्ष, भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, तमिळनाडू मुथरयार संगम, तमिळ मक्कल मुन्नेत्र कळघम्, थोटिया नयकर पेरावई, कोंगुनाडू इलेगनार पेरावई, तमिळनाडू कुरुंबर पेरावई, तमिळनाडू कुरंबुर इलेगनार संगम, इंटरनॅशनल संबवार सोसायटी, पद्मसालियार संगम, वेळ्ळालर मुन्नेत्र संगम, तमिळनाडू अनेथू पिल्लाईमर महासभा, तमिळनाडू रेड्डी नाला संगम, मुथरयार संगम, सेंगुथा मुदलियार संगम, अखिल भारतीय नदार मन्युअल पेरावई, तमिळनाडू नदार संगम आदी संघटनांच्या नेत्यांसह २६० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
धर्माचाच विजय निश्चित ! – रमेश शिंदे
स्वत:ला निधर्मी म्हणवणारे सरकार हज यात्रेकरूंना अनुदान देते, तर कुंभमेळ्यावर कर आकारते. रोहिंग्या मुसलमानांमुळे आज जम्मू-काश्मीर राज्यात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. तमिळनाडूमध्ये हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या होत आहेत. अशा स्थितीत सर्व हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. भगवद्गीतेतील वचनानुसार शेवटी धर्माचाच विजय निश्चित आहे.
क्षणचित्रे
१. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. रघुराम आणि श्री. उमापट्टी यांनी योगदान दिले.
२. भाजपचे तमिळनाडू प्रदेश उपाध्यक्ष बी.टी. अरसाकुमार यांनी सभागृहाचे आरक्षण आणि भोजनव्यवस्था यांचे दायित्व स्वीकारले होते.
३. गोव्यातील अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन आयोजित करण्याचा श्री. संतोषकुमार यांचा प्रयत्न होता.
४. केवळ स्वत:च्या समाजासाठी मर्यादित कार्य करणार्या अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी संघटितपणे कार्य करण्याची सिद्धता दर्शवली.
५. या वेळी श्री. रमेश शिंदे यांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले की, श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनात सुस्पष्टता आणि धारणाशक्ती होती.