नवी दिल्ली : हैदराबाद येथील प्रसिद्ध मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी स्वामी असीमानंदयांच्यासह सर्व पाच आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अखत्यारीतील प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या हैदराबादेतील विशेष सत्र न्यायालयानं आज हा निकाल दिला.
२००७च्या मे महिन्यात मक्का मशिदीत झालेल्या स्फोटात ९ जण ठार तर ५८ जखमी झाले होते. या प्रकरणी दहा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांना अटक करून त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता. नबाकुमार सरकार ऊर्फ स्वामी आसीमानंद हे त्यांच्यापैकी एक होते. मात्र, आसीमानंद व भारत मोहनलाल रत्नेश्वर हे दोघे सध्या जामिनावर आहेत. तर, अन्य तिघे हैदराबदेतील तुरुंगात आहेत.
बॉम्बस्फोटाचा सुरुवातीचा तपास पोलिसांनी केला होता. त्यानंतर तो सीबीआयकडं सोपवण्यात आला. शेवटी २०११ साली हे प्रकरण एनआयएकडं देण्यात आलं. या प्रकरणी एकूण १६० प्रत्यक्षदर्शीची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्यातील ५४ साक्षीदारांनी कालांतरानं त्यांचे जबाब फिरवले. अखेर तब्बल ११ वर्षांनी आज या प्रकरणाचा निकाल लागला. यातील दोन मुख्य आरोपी संदीप डांगे व रामचंद्र कलसंगरा आजही फरार आहेत.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स