हिंदूंनी धर्माचरण करून समाजाला योग्य दिशा द्यावी ! – मदन सावंत, हिंदु जनजागृती समिती
जांब (तालुका वाई, जिल्हा सातारा) : हिंदूंनी गुढीपाडवा साजरा करू नये, यासाठीच औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना हालाहाल करून मारले. औरंगजेबाचे ते असुरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही संघटना गुढीपाडवा आणि अन्य हिंदूंच्या सणांविषयी संभ्रम निर्माण करून अपप्रचार करतात. हिंदूंनी धर्माचरण करून समाजाला योग्य दिशा द्यावी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत यांनी केले. ते १५ एप्रिल या दिवशी येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या सातारा जिल्ह्यातील ४६ व्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. सभेस ५०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. महिला आणि युवतींचा सहभाग लक्षणीय होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन, तसेच दीपप्रज्ज्वलन करून सभेस प्रारंभ झाला. श्री. आकाश शिंदे आणि सौ. रंजना शिंदे यांनी वक्त्यांचे स्वागत केले. श्री. मदन सावंत पुढे म्हणाले, ‘‘हिंदु धर्मावर होणार्या आघातांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. ‘लव्ह जिहाद’, पंढरपूर येथील विठ्ठलमंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर, मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिर या देवस्थानांच्या संपत्तीचा अपहार होत आहे. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनापायी संत, तसेच हिंदुत्वनिष्ठ नेत्यांवर अन्याय्य कारवाई केली जात आहे. त्यामुळे आता केवळ इतिहास ऐकण्याची नव्हे, तर इतिहासातून बोध घेऊन इतिहास घडवण्याची वेळ आली आहे.’’
धर्मांध आणि वासनांध यांच्याकडून होणारे आघात परतवण्यासाठी महिला, तसेच युवतींनी स्वत:मध्ये आत्मबळ निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन प्रतिकारक्षम होणे हा प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांनी केले.
सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली. समितीचे श्री. सुनील दळवी आणि कु. प्रियांका साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा श्री. राहुल कोल्हापुरे यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. विनायक कुलकर्णी यांनी केले.
प्रतिसाद
- सभेनंतर धर्मप्रेमींनी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी केली.
- ‘अन्य भाषणांमधून इतिहासाची माहिती मिळते; मात्र समितीच्या वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून परंपरांसमवेतच धर्माचरण आणि धर्मरक्षण कसे करायला हवे, याचीही माहिती मिळाली. ती आम्ही कृतीत आणू’, असे युवकांनी सभेनंतर सांगितले.
सत्कार
प्रतिदिन नामजप करणारे, शाळेतही धर्माचरण करणारे, तसेच त्याविषयी शिक्षकांचे प्रबोधन करणारे धर्मप्रेमी विद्यार्थी शिवम शिंदे, मयूर शिंदे आणि आदित्य शिंदे यांचा वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हिंदु धर्मजागृती सभेचे यशस्वी आयोजन करणार्या ‘१४ मावळे संघटनेचा’ही सत्कार करण्यात आला. तो श्री. हर्षद शिंदे यांनी स्वीकारला.
क्षणचित्र : सभास्थळी क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन, तसेच सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.