Menu Close

धुळे येथे श्री महाकालेश्‍वर महादेव मंदिर बांधकाम विभागाने अनधिकृत ठरवून पाडले

मंदिरांवर तात्काळ कारवाई करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ? – हिंदु जनजागृती समिती

मंदिरातील भगवान शिवाची पिंडी पहारीने उखडून काढतांना बांधकाम विभागातील कर्मचारी. (या चित्राद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून पिंडी कशा प्रकारे उखडून काढली जात आहे, ते समजावे यासाठी छायाचित्र प्रकाशित करत आहोत. – संपादक)

धुळे : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पुढे करून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात श्री महाकालेश्‍वर महादेव मंदिर अनधिकृत ठरवून पाडले. वास्तविक हे पुरातन मंदिर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा पुरातन मंदिरांचे स्थलांतर किंवा पुनर्स्थापना करण्याची तरतूद असतांना केलेली ही कारवाई एकतर्फीच आहे, असे सर्वसामान्याला वाटल्यास नवीन नाही.

हिंदु सहिष्णु आहेत; म्हणून केवळ हिंदूंचीच मंदिरे पाडायची आणि अन्य धर्मियांना कुरवाळायचे, हे आता हिंदुत्वनिष्ठ संघटना कदापिही सहन करणार नाहीत. या घटनेचा समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध केला आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, 

सार्वजनिक बांधकाम प्रशासन आणि पोलीस यांनी श्री महाकालेश्‍वर महादेव मंदिर पाडण्याविषयी जी तत्परता दाखवली, तशीच तत्परता सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत ठरवलेल्या मशिदी, दर्गे, मदरसे, चर्च यांवर कारवाई करतांना दाखवणार का ? मुंबई-आग्रा महामार्गावरील धडगांव येथील दर्गा अनधिकृत असतांना तो हटवण्याऐवजी महामार्ग बाजूने बनवण्यात आला, म्हणजे केवळ हिंदूंचीच मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडायची आणि अन्य धर्मियांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांच्या विरोधात कारवाईला स्थगिती द्यायची, ही कसली धर्मनिरपेक्षता ? अन्य धर्मियांना खूश करण्यासाठी काही राजकारण्यांच्या सांगण्यावरून ही कृती होत आहे का ?, अशी जनतेच्या मनात शंका येत आहे. अशा प्रकारची दुटप्पी भूमिका घेणार्‍या अधिकार्‍यांवरच कारवाई करायला हवी.

हिंदु जनजागृती समितीने गेली अनेक वर्षे ‘मंदिर सरकारीकरण’ कायद्याला विरोध केला आहे. श्री महालक्ष्मी देवस्थान, पंढरपूर देवस्थान, तुळजापूर देवस्थान, श्री सिद्धीविनायक मंदिर देवस्थान यांच्या समित्यांमधील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार हिंदु जनजागृती समितीने उघड केलेला आहे आणि ‘सीबीआय’ चौकशी करून संबंधित दोषी अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. असे असतांना मंदिर मग ते पृथ्वीवरील कुठलेही असो, हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यास विरोध करणारच ! जनसामान्यांच्या भावना या विकासाच्या विरोधात नाही, तर केवळ एकतर्फी होत असलेल्या कारवाईच्या विरोधात आहेत, हे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने लक्षात घ्यावे.

या चित्राद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून केवळ नागदेवतेची मूर्ती बुलडोझरद्वारे उखडून कशी काढली जात आहे, ते समजावे यासाठी चित्र प्रकाशित करत आहोत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *