भगव्या आतंकवादाच्या नावाखाली देशभक्तांना नाहक कारागृहात ठेवल्याने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करा !
पंढरपूर : भाग्यनगर (हैद्राबाद) येथील मक्का मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व ५ हिंदु आरोपींना न्यायालयाने निर्दोषमुक्त केले, तसेच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित आणि अन्य आरोपी यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. केवळ राजकीय द्वेषापोटी देशभक्तांंना बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवले. हिंदुत्वाला अपकीर्त करणे आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणे यासाठी तत्कालीन सरकार आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम् यांनी ‘भगवा आतंकवाद’ या नावाखाली देशभक्तांना कारागृहात डांबले. लोकशाहीत जनतेने दिलेल्या सर्वोच्च पदाचा अपलाभ राजकीय स्वार्थासाठी करणार्या या नेत्यांवर कारवाई करून त्यांना निवडणूक लढवण्यास आजन्म बंदी आणावी आणि देशभक्तांचा छळ केल्याप्रकरणी शासन करावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे येथील प्रांत अधिकारी श्री. सचिन ढोले यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने देण्यात आले. या वेळी हिंदू महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पेशवा युवा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की…
१. देशाची सर्वोच्च पदे उपभोगणार्या उत्तरदायी व्यक्तींकडून केवळ राजकीय लाभासाठी हे कुभांड रचण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा तपास यंत्रणा आणि सरकार यांच्यावरील विश्वासाला तडा गेला आहे.
२. शांतता, बंधुत्व यांसाठी प्रसिद्ध आणि महान संस्कृती जोपासणार्या हिंदु धर्माची अपकीर्ती झाली आहे.
३. ‘सहस्रो अपराधी सुटले, तरी चालतील; पण एका निरपराध्याला शासन होता कामा नये’, या नैसर्गिक न्यायाशी हा वरील प्रकार विसंगत आहे.