खरगोन (मध्यप्रदेश) : जगात ५२ मुसलमान आणि १५७ हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत. जगातील प्रत्येक देश त्यांच्या बहुसंख्यांक जनतेच्या पंथाला संरक्षण देतो. कोणताही देश स्वत:ला सेक्यूलर किंवा धर्मनिरपेक्ष म्हणवत नाही. अशा स्थितीत भारतात बहुसंख्य हिंदू असतांनाही आपला देश हिंदु राष्ट्र का नाही ?, या विचाराने येथील हिंदू अस्वस्थ आहेत, अशी खंत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी व्यक्त केली. मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिणी पश्चिम भागात असलेल्या खरगोन येथील टाऊन हॉलमध्ये विश्व हिंदु परिषदेच्या वतीने संतश्री पूर्णानंद विचार महायज्ञाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदर्श हिंदु राष्ट्र कसे होईल ?, या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर पू. ज्ञानीजी, अधिवक्ता महेश वर्मा, डॉ. चंद्रजीत सांवले, सर्वश्री दीपक कानूनगो, योगेश व्हनमारे, राजेशजी बेडवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान दिले, अशा क्रांतीकारकांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे.
खरगोन (मध्यप्रदेश) येथे पत्रकार परिषद
देशात गोमांस उघडपणे विकले जात आहे ! – सद्गुरु (डॉ.) पिंगळे
देशात गोवा, त्रिपुरा या राज्यांसमवेत काही राज्यांमध्ये गोमांस उघडपणे विकले जात असून तेथील सरकारमधील लोकही याचे समर्थन करत आहेत. राम मंदिर नक्कीच झाले पाहिजे; मात्र त्यापूर्वी मंदिराचे रक्षण होणेही अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. बंगालमधील हिंसाचाराविषयी बोलतांना ते म्हणाले, तेथील बॅनर्जी सरकारला राज्यात बांगलादेशी लोकांना स्थायिक करायचे आहे. हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश समितीचे सदस्य रवि जायसवाल, भाजपचे वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष डॉ. दिनेश रघुवंशी उपस्थित होते. डॉ. रघुवंशी आणि त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.