चेन्नई : अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने धर्मरक्षणासाठी समर्पित भावाने कार्य करणार्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी पुरस्कार नुकताच प्रदान करून गौरवण्यात आले. चोलाई येथे झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन महासभेचे नेते कोडम्बक्कम् श्री यांनी केले होते. या कार्यक्रमामध्ये ४० हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुगंधी जयकुमार आणि श्री. जयकुमार उपस्थित होते.
निवृत्त न्यायाधीश श्री. भास्करन् यांच्या हस्ते सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांना त्रिशूळ आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या वेळी श्री. भास्करन् यांनी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. सौ. सुगंधी जयकुमार यांनी उपस्थितांना संबोधित करतांना हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व विशद केले. या वेळी हिंदु इलेन्यार एझुची पेरावी या संघटनेचे श्री. पाझा संतोष, हिंदु अथिरादी पदाई या संघटनेचे श्री. राजगुरु, भाजपच्या नेत्या श्रीप्रिया, शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन्, कोडम्बक्कम श्री आदींनी त्यांचे विचार व्यक्त केले. हिंदु मुन्नेत्रम्चे नेते श्री. बालाजी म्हणाले, त्रिशुळ हे धर्मांध आणि भ्रष्टाचारी यांच्या विरोधात लढण्यासाठी आपली क्षात्रवृत्ती वृद्धींगत करण्याचे प्रतीक आहे. भारत हिंदु मुन्नानीचे नेते आर्.डी. प्रभु यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली.