मंदिरांमध्ये अर्पण केलेला पैसा सामुदायिक विवाह सोहळ्यांवर खर्च करण्याचा निर्णय रहित करा : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
जळगाव : पाकिस्तानातून भारतात निर्वासित झालेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे, आमदार टी. राजासिंह यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणाची चौकशी करण्यात यावी, मंदिरांचा निधी सामूहिक विवाह सोहळ्यांवर खर्च करण्याचा निर्णय रहित करावा आणि शहरातील अनधिकृत ठरवून पाडण्यात येत असलेल्या मंदिरांच्या घटनेचा निषेध करणे या प्रमुख मागण्यांकरिता महाराणा प्रताप चौक, धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
भारत शासनाने निर्वासित हिंदूंना त्यांच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सोयी-सुविधा पुरवाव्यात, त्यांना बळजोरीने पाकिस्तानात पाठवू नये, असे हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी या वेळी सांगितले.
आधीच शासकीय योजनांमध्ये कमालीचा भ्रष्टाचार होत असतांना सामूहिक विवाह सोहळा योजनेत भ्रष्टाचार होणार नाही आणि सामूहिक विवाह सोहळ्यांच्या नावाखाली देवनिधी लुटला जाणार नाही, याची हमी कोण देणार ? यापूर्वी देवनिधीमध्ये ज्यांनी लुटला, त्यांच्यावर कारवाई कधी करणार ? याची उत्तरे मुख्यमंत्री महोदय हिंदु समाजाला देतील का ? शासनाला पैसे द्यायचे असतील, तर ते अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांसाठी आणि पैसे घ्यायचे असतील, तर ते हिंदूंच्या मंदिरांतून असे धोरण अत्यंत निषेधार्ह असून मंदिरांतील पैसा हा सामूहिक विवाहसोहळ्यांवर नाही, तर धर्मकार्यासाठीच वापरला गेला पाहिजे, अशी भूमिकाही या वेळी आंदोलनात मांडण्यात आली.
आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. पंकज धात्रक, बजरंग दलाचे श्री. संदीप चौधरी, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. मनोज घोडके, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर शहरात एकतर्फीपणे केवळ हिंदूंच्याच मंदिरांना अनधिकृत ठरवून सामाजिक बांधकाम विभाग जी कारवाई करत आहे, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी उपजिल्हाधिकारी विलास अंतुर्लीकर यांना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.