जळगाव : पाकिस्तानातून भारतात निर्वासित झालेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे, मंदिरांचा निधी सामूहिक विवाह सोहळ्यांवर व्यय करण्याचा आणि मंदिरांमध्ये पगारी महिला पुजारी नेमण्याचा निर्णय रहित करावा, या प्रमुख मागण्यांसाठी येथील महानगरपालिकेसमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
‘शासनाने निर्वासित हिंदूंना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सोयी-सुविधा पुरवाव्यात, त्यांना भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी साहाय्य करावे, निर्वासित हिंदूंना त्यांचे पारपत्र संपल्यावर अथवा अन्य कारणास्तव बळजोरीने पाकिस्तानात पाठवू नये, कोरेगाव भीमा दंगलीत हिंसाचार करणार्या एक सहस्रांहून अधिक दंगलखोरांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय रहित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी’, अशा मागण्याही हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांनी आंदोलनात केल्या.
आंदोलनप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, सिंधू सेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर उपजिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके यांना आंदोलनातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.