सांगली : भारतातील हिंदु राष्ट्र ही संकल्पना धर्म, संस्कृती, वेदादि ग्रंथ, परंपरा यांनी बनलेली आहे. भारतावर काही शतके मुसलमान आणि ख्रिस्ती इत्यादी आक्रमकांकडून अनेक आक्रमणे झाली; मात्र या देशातील हिंदू त्यांच्या परंपरा, धर्म, संस्कृती यांच्याशी एकनिष्ठ राहिले. याला भारतातील संत परंपराही कारणीभूत आहे. त्या काळी संत तुलसीदास, समर्थ रामदासस्वामी, संत तुकाराम महाराज यांनी हिंदूंच्या मनात राष्ट्र ही संकल्पना जिवंत ठेवली. भारत स्वतंत्र झाला; मात्र देशातील पुरोगाम्यांनी ‘सेक्युलरवाद’ अर्थात धर्मनिरपेक्षतेच्या नावे हिंदूंचा इतिहास विकृत करण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे हिंदूंना स्वधर्माची लाज वाटू लागली असून ते स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत आहे. पाश्चात्त्य विकृतीचे समर्थन चालू झाले आहे. या आक्रमणाच्या माध्यमातून शेकडो वर्षांच्या आक्रमकांना जे साध्य झाले नाही, ते हिंदूंच्या मनातील ‘हिंदु राष्ट्र’ही संकल्पना पुसण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. हे रोखण्यासाठी धर्माचरण आणि धर्मशिक्षण यांद्वारे हिंदु राष्ट्र ही प्राचीन आणि सनातन संकल्पना साकारण्यासाठी आपण प्रत्येकाने यथाशक्ती योगदान दिले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते २१ एप्रिल या दिवशी विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
ते पुढे म्हणाले
१. इंग्रजी कालगणनेप्रमाणे सध्या वर्ष २०१८ चालू आहे; मात्र हिंदूंनी हे वर्ष अधिकृत मानल्यास युगानुयुगे चालत आलेली हिंदूंची लक्षावधी वर्षांची परंपरा विसरली जाते.
२. भारत हे राष्ट्र-राज्य आहे. संतपरंपरा, धर्मपरंपरा यामुळे हे राष्ट्र टिकून आहे. यावरच आघात करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. हिंदूंना चुकीचा इतिहास शिकवला जात आहे, धर्मशास्त्राला अंधश्रद्धा ठरवून त्यांना मूर्ख बनवले जात आहे. हिंदु संस्कृतीचा घटक नसलेल्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या विकृतीला प्रोत्साहन दिले जात आहे. हिंदुबहुल भारत ‘सेक्युलर’ राष्ट्र आहे, असे हिंदूंना सांगून त्यांची फसवणूक केली जात आहे.
३. भारत स्वतंत्र झाला; मात्र न्याययंत्रणा, शिक्षणयंत्रणा, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था इत्यादी सर्वच व्यवस्था आपण इंग्रजांकडून घेतल्याने हिंदूंना खरे स्वातंत्र्य मिळालेच नाही. आजही इंग्रजीची गुलामगिरी चालू आहे.
४. एकीकडे देश ‘सेक्युलर’ आहे म्हणायचे आणि सर्व सुविधा मात्र अल्पसंख्यांकांना द्यायच्या, अशी भारतात स्थिती आहे. या देशातील बहुसंख्य हिंदूंना सातत्याने दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. हिंदूंना परत एकदा सन्मानाने जगण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे.
५. अनेक संतांनी सांगितल्यानुसार आणि कालमहिम्यानुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे. आपली संख्या अल्प आहे; म्हणून चिंता करू नका. जो भगवंत आपल्या केवळ एका भक्त प्रल्हादासाठी अवतार घेतो, तो आपणही भगवंताची उपासना केल्यास आपल्यासाठी का येणार नाही ? ‘यतो धर्म स्ततो जय:।’ या भगवद्गीतेतील श्लोकानुसार आपण ‘सेक्युलर’ न होता धर्म आचरणात आणा. ईश्वर निश्चितच हिंदु राष्ट्र साकार करेल, याची निश्चिती बाळगा !