हिंदूंच्या समस्यांविषयी असंवेदनशील असणार्यांना मत देऊ नका ! : अधिवक्ता श्री. मोहनराव डोंगरे
पुणे : बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकात धर्माच्या आधारे फाळणी होत असेल, तर पाकिस्तानमधील शेवटचा हिंदू भारतात आणा, असे त्यांनी सांगितले होते. हिंदूंच्या समस्यांविषयी शासनकर्त्यांना काडीमात्रही घेणे देणे नाही. अशा शासनाला हिंदूंनी मत देऊ नये. हिंदूंनी एकत्र येऊन त्यांची संघटन शक्ती दाखवून देणे आवश्यक आहे. जगातील कोणत्याही ठिकाणी हिंदूंवर अन्याय झाला, तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे प्रतिपादन प्रखर धर्माभिमानी अधिवक्ता मोहनराव डोंगरे यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक चौक, पुणे आणि चापेकर चौक, चिंचवड येथे २२ एप्रिल या दिवशी विविध मागण्यांसाठी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले. आंदोलनात ते बोलत होते.
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय त्वरित थांबवावा, पाकमधील निर्वासित हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना भारताचे नागरिकत्व द्यावे, मंदिरांमध्ये अर्पण केलेला निधी सामुदायिक विवाह सोहळ्यांवर व्यय करण्याचा निर्णय रहित करावा, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात महिला पुजारी नेमून सहस्रो वर्षांची परंपरा मोडीत काढण्याचा घाट मागे घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. पुणे आणि चिंचवड येथे अनुक्रमे ६० अन् ५० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आंदोलनस्थळी जिल्हाधिकार्यांना देण्यात येणार्या मागण्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली. या मोहिमेला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला.
पुणे
निधर्मी शासनामुळे हिंदु धर्म संकटात !- पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
निधर्मी शासनामुळे हिंदु धर्म संकटात सापडला आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कर्नाटकातील काँग्रेस सरकार राज्यातील १८ प्रतिशत लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेऊन हिंदु धर्मात फूट पाडण्याचे कारस्थान करत आहे. मुळात लिंगायत वीरशैव हे हिंदु धर्माचे भाग आहेत. ‘लिंगायत’ हा शब्दच धर्मवाचक नाही, तर तो एक दीक्षा संस्कार आहे. हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक असल्याने सर्वांनी त्यासाठी प्रतिदिन वेळ द्या.
काश्मीरमध्ये रोहिंगे राहू शकतात, तर हिंदुस्थानात हिंदूंना स्थान का नाही ? – संतोष गोपाळ, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
‘हिंदूंना हिंदुस्थानात घ्या’, अशी मागणी करावी लागणे ही शोकांतिका आहे. परदेशातील हिंदूंना हिंदुस्थानात आल्यावर येथे रहाण्याची इच्छा असते; परंतु आजचे सरकार अशा हिंदूंना शोधून त्यांना पुन्हा परदेशी पाठवत आहे. काश्मीरमध्ये रोहिंग्यांची वसाहत होऊ शकते, तर हिंदुस्थानात हिंदूंना स्थान का नाही ? शासनाने अशा हिंदूंना परत आणून त्यांचे पुनर्वसन करावे.
वक्फ बोर्ड आणि चर्चमधील निधी सामाजिक कार्यांसाठी का वापरत नाही ? – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा
श्री महालक्ष्मी मंदिरात महिला पुजार्यांना नेमून धर्मनिरपेक्ष शासन हिंदूंना मिळालेल्या धार्मिक अधिकारावरच घाला घालत आहे. गर्भगृहात महिलांना प्रवेश निषिद्ध असणे ही गोष्ट स्त्री-पुरुष समानतेविषयी मुळीच नाही, तर ती धार्मिकतेविषयी असून त्या मागे शास्त्रीय कारण आहे. शासनाच्या या निर्णयाचा आम्ही सर्व महिला निषेध करतो. हिंदूंनी श्रद्धेपोटी अर्पण केलेला निधी शासन परस्पर सामूहिक विवाहांसारख्या सामाजिक उपक्रमांसाठी वापरते. असे असेल, तर वक्फ बोर्ड आणि चर्चमधील निधी सामाजिक उपक्रमांसाठी का वापरत नाही ?
चिंचवड (जिल्हा पुणे)
शेतकर्यांना भक्ती कशी करावी, हे शिकवावे ! – चंद्रशेखर तांदळे, सनातन संस्था
शेतकर्यांच्या मुला-मुलींचे विवाह करण्यासाठी व्यय करावा लागत असल्याने त्या दडपणाखाली शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा निष्कर्ष काढून मंदिरात भक्तीभावाने अर्पण केलेला निधी सामूहिक विवाहासाठी वापरला जातो. असे निर्णय घेण्याऐवजी शासनाने धर्माचरण ठाऊक नसलेल्या शेतकर्यांना ईश्वराची भक्ती कशी करावी, हे शिकवावे. त्यामुळेच त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण न्यून होईल.
समितीचे श्री. नागेश जोशी म्हणाले, ‘‘सरकारने महालक्ष्मी मंदिरात महिला पुजार्यांची नियुक्ती करण्याचा धर्मविरोधी निर्णय घेतला आहे. सरकारने हिंदूंच्या धार्मिक गोष्टींत लुडबूड करू नये.’’
‘हिंदु समाज एकसंघ रहावा, यासाठी प्रयत्नरत राहूया’, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेचे सहमंत्री श्री. धनंजय गावडे यांनी केले. बजरंग दलाचे श्री. यशवंत कर्डीले यांनी पाकिस्तानमधील हिंदु निर्वासितांवर झालेल्या अन्यायाविषयी परखड मत व्यक्त केले. पाकिस्तानमधील हिंदूंची संख्या केवळ २ दशकांत २८ प्रतिशत पासून ६ प्रतिशत एवढी होते, तर हिंदुस्थानातील मुसलमानांची संख्यावाढ याउलट आहे. ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्षणचित्रे
१. पुणे येथील आंदोलनात श्रीनाथ रेड्डी या युवकाने लिंगायत धर्माविषयी ऐकून आंदोलनाचे छायाचित्र घेतले. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याला आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितल्यावर त्यानेही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
२. आंदोलनाचे फेसबूकवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण १ सहस्र ६०० जणांनी पाहिले, ६ सहस्र ५०० जणांपर्यंत आंदोलन पोहोचले, २१० जणांनी फेसबूक पोस्टला ‘लाईक’ केले, २१० जणांनी ‘शेअर’ केले आणि ४१ जणांनी ‘कमेंट’ केले (मत नोंदवले).
३. लिंगायत गवळी समाजाचे श्री. शरद गंजीवाले यांनी लिंगायत समाजाव्यतिरिक्त हिंदूंनी एकत्रितपणे हिंदूंमध्ये दुही माजवणार्यांविरुद्ध आवाज उठवला, त्यासाठी समितीचे अभिनंदन केले.