मंदिरामध्ये महिला पुजार्यांची नेमणूक करणे धर्मशास्त्रसंमत नसल्याने हा निर्णय मागे घ्यावा ! – हरिश घोशिकर, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
नागपूर : शासनाने महिला पुजार्यांची नेमणूकही करण्याचे जाहीर केले. महिलांचा मंदिर प्रवेश हा विषय स्त्री-पुरुष समानतेचा नसून पूर्णतः धार्मिक आहे. मंदिरामध्ये महिला पुजार्यांची नेमणूक करणे, हे धर्मशास्त्रसंमत नाही. हा निर्णय मागे घ्यावा, तसेच धार्मिक विषयांतील निर्णय घेतांना शंकराचार्य वा काशी विद्वत परिषद यांचे मार्गदर्शन घेऊन हिंदु समाजाला विश्वासात घ्यावे. कोरेगाव भीमा दंगलीत हिंसाचार करणार्या एक सहस्रांहून अधिक दंगलखोरांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय रहित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. हरिश घोशिकर यांनी केल्या. येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.
पाकमधील निर्वासित हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना भारताचे नागरिकत्व द्यावे, मंदिरांमध्ये अर्पण केलेला पैसा सामुदायिक विवाह सोहळ्यांवर खर्च करण्याचा निर्णय रहित करावा, मंदिरांमध्ये महिला पुजारी नियुक्त करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय रहित करण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी येथील झाशी राणी चौक येथे २१ एप्रिलला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेतला होता. हिंदुत्वनिष्ठांनी विविध दिलेल्या घोषणांमुळे झाशी राणी चौक परिसर दणाणून गेला. आंदोलनामध्ये श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. हरीश घोशिकर, सनातन संस्थेच्या सौ. मंगला पागनीस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत पोलके यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला आणि सनातन संस्थेच्या सौ. मंगला पागनीस यांनीही त्यांची मते मांडली.