Menu Close

ऐरोली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हिंदूंनो, लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देऊन हिंदु धर्मात फूट पाडणार्‍या स्वार्थी पक्षाला त्यांची जागा दाखवून द्या ! – रमेश सनिल, हिंदु जनजागृती समिती

ऐरोली : कधी नव्हे एवढी सध्याच्या काळात हिंदू ऐक्याची आवश्यकता असतांना काँग्रेस पक्ष कर्नाटक निवडणुकीत जिंकण्यासाठी शिवपूजक लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देत आहे आणि हिंदु धर्मात फूट पाडत आहे. अशा स्वार्थी पक्षास त्यांची जागा हिंदूंनी दाखवून द्यायला हवी, असे संतप्त उद्गार येथील आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश सनिल यांनी काढले. या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, योग वेदांत सेवा समिती यांचे कार्यकर्ते, तसेच नरेंद्र महाराज यांचे एक भक्त यांची उपस्थिती होती. एका शिक्षिकेनेही आंदोलनाला उपस्थित राहून समितीचे कौतुक केले.

पोलिसांचा नाकर्तेपणा !

आंदोलनानंतर २ मद्यपी तेथे गोंधळ घालत होते. त्यांनी त्यांच्या बाजूने १५-२० जणांना एकत्र केले. ते मद्यपी मधेच असिफा प्रकरण, मोदी आणि संघ यांविषयी अपशब्द बोलून अप्रत्यक्षरित्या आंदोलनाला विरोध करत होते. आंदोलनाच्या विरुद्ध बाजूसच हा प्रकार चालू होता; मात्र पोलिसांनी शेवटपर्यंत काहीही ठोस भूमिका घेतलेली नाही. ते विरोधक आणि पोलीस आंदोलनाचे चित्रीकरण करत होते. विरोधकांचा विरोध वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जीप मागवून ती गर्दी पांगवली. तणावपूर्ण वातावरणामुळे सायंकाळी ६.३० वाजता आंदोलन संपवावे लागले. या वेळी सर्वच कार्यकर्ते श्रीकृष्णाला भावपूर्ण प्रार्थना करत होते. ‘श्रीकृष्णानेच या वेळी साहाय्य केले’, असे सर्वांना वाटले.

उपकार केल्यासारखी भाषा वापरणारे पोलीस !

‘मद्यपी रस्त्यावर गोंधळ घालत असतांना त्यांना साधे हटकले का नाही’, असे कार्यकर्त्यांनी एका उच्च पोलीस अधिकार्‍याला विचारल्यावर ते निरुत्तर होऊन म्हणाले, ‘‘बास करा आता तुम्ही ! आम्ही तुम्हाला वेळ दिला ना. आता तुम्ही आंदोलन थांबवा. आम्ही मद्यपींनाही हाकलतो.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *