Menu Close

पू. आसाराम बापूजींना न्याय मिळण्यासाठी लढत राहू : हिंदु जनजागृती समिती

स्वामी असीमानंद यांच्या मुक्ततेवरून न्यायालयाच्या निर्णयावर शंका उपस्थित करणारे आता गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जोधपूरमधील कथित बलात्काराचे प्रकरण

जोधपूर : पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना येथील विशेष न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यांना या गुन्ह्यात साहाय्य करणारे त्यांचे भक्त शिल्पी आणि शरतचंद्र यांना न्यायालयाने प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच पू. बापूजी यांना १ लाख, तर अन्य दोघांना प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी प्रकाश आणि शिव या अन्य दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ‘पू. बापूजी यांचे वय पहाता त्यांना अल्प शिक्षा मिळावी’, अशी विनंती त्यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाला केली होती; मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. ‘त्यांनी केलेले कृत्य अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्यांना मरेपर्यंत कारागृहातच रहावे लागेल’, असे विशेष न्यायाधिशांनी सांगितले. ‘पोक्सो’ आणि ‘एस्सी-एस्टी’ कायद्यासह वेगवेगळ्या १४ कलमांखाली पू. बापूजी यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

पू. बापूजी ७८ वर्षांचे असून ते गेल्या साडेचार वर्षांपासून कारागृहात आहेत. या निर्णयावर उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येऊ शकते.

१. पू. बापूजी यांच्यावर आरोप करणारी कथित पीडित मुलगी उत्तरप्रदेशमधील शहाजहानपूर येथील आहे. ती शिक्षणासाठी जोधपूरमधील मनाई गावात असलेल्या पू. बापूजींच्या आश्रमात रहात होती. उपचार करण्याच्या नावाखाली पू. बापूजी यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा तिने आरोप केला होता.

२. या प्रकरणातील एकूण ४४ साक्षीदारांपैकी ९ साक्षीदारांवर आक्रमणे झाली आहेत आणि त्यातील ३ जणांचा मृत्यू, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार महेंद्र चावला यांनीही त्यांच्या जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना उच्च न्यायालयात न्याय मिळेल, अशी आमची श्रद्धा ! – सनातन संस्था

विशेष न्यायालयाने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना दोषी ठरवले असले, तरी आपल्या संविधान प्रदत्त न्यायिक परंपरेनुसार कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविषयी असमाधान असेल, तर उच्च न्यायालयात जाता येते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही जाता येते. यापूर्वी अनेकांना कनिष्ठ न्यायालयात झालेली शिक्षा पुढे उच्च तथा सर्वोच्च न्यायालयात रहित झालेली आहे. आमची न्यायदेवतेवर श्रद्धा आहे, तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना न्याय मिळेल, अशी आशा आहे, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, आज कोट्यवधी हिंदूंना भक्तीमार्गाला लावून त्यांचे जीवन कृतार्थ करणे, भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ ‘व्हॅलेन्टाईन-डे’सारख्या कुप्रथांना विरोध करत देशभरात मोठ्या प्रमाणावर ‘मातृ-पितृ दिन’ साजरे करणे, ख्रिस्ती पंथांत धर्मांतरित झालेल्या लाखो हिंदूंना स्वधर्मात आणणे, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरणे, गोसंवर्धन करणे, बालसंस्कारवर्गांच्या माध्यमातून भावी पिढी सुसंस्कारीत करणे आदी अनेक महत्कार्ये पूज्यपाद संतश्री आसारामबापूजी यांनी केली आहेत. त्यामुळे ते हिंदु समाजासाठी आदरणीयच आहेत.

पू. आसाराम बापूजींना न्याय मिळण्यासाठी लढत राहू ! – हिंदु जनजागृती समिती

पू. आसाराम बापूजी यांनी गेले काही दशके समाजहितासाठी चांगले कार्य केलेले आहे. मग ते वनवासी क्षेत्रातील कार्य असो वा शिक्षणक्षेत्रातील. अन्य पंथांत गेलेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. लोकांना धर्ममार्गावर आणण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. जोधपूर न्यायालयाचा निकाल हा मोठा धक्काच आहे. तरीही प.पू. बापूजींच्या भक्तांनी संयम ठेवून समंजसपणा दाखवला आहे. न्यायालयाचा हा निर्णय दुर्दैवी आहे. अर्थात् त्यामुळे पुढच्या न्यायालयात न्याय मागण्याचा त्यांचा अधिकार काही संपलेला नाही. भारताच्या इतिहासात असे अनेक खटले आहेत की, ज्या प्रकरणांत खालच्या न्यायालयाचा निकाल वरिष्ठ न्यायालयाने पालटला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत न्यायिक आणि संविधानिक मार्गाने लढणे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याअंतर्गंत पू. आसाराम बापूजींसाठी केलेल्या प्रयत्नांना सहकार्य करू, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

संतांच्या आश्रमावर आक्रमण करून भक्तांना त्रास देणार्‍यांनाही न्यायालयात शिक्षा होऊ शकते, हे ते विसरले काय ?

पू. बापूजी यांच्या अकोला येथील आश्रमावर आक्रमण !

अकोला : अकोला-पाचूर मार्गावरील पू. आसाराम बापूजी यांच्या आश्रमावर दुपारी ३.३० वाजता अज्ञातांनी आक्रमण केले. या वेळी त्यांचे फलक फाडण्यात आले, तसेच सामानाची तोडफोड करण्यात आली.

(म्हणे) ‘लोकांनी आता खरे आणि खोटे संत यांना ओळखण्याची क्षमता निर्माण करावी !’ – काँग्रेस नेते अशोक गेहलोत

पू. आसाराम बापू यांना शिक्षा झाल्यावर प्रतिक्रिया देतांना काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, आता वेळ आली आहे की, खरे आणि खोटे संत ओळखण्यासाठी लोकांनी सक्षम झाले पाहिजे; कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा घटनांनी भारताची प्रतिमा बिघडली जाते. (संतांपेक्षा प्रथम ढोंगी, भ्रष्टाचारी, देशद्रोही राजकारणी आणि खरे देशभक्त राजकारणी यांना जनतेने ओळखण्याची वेळ आता आली आहे, असे म्हणायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

  • लोकांनी खरे आणि खोटे संत ओळखण्यासाठी धर्माचरण करून साधना केली, तरच त्यांना त्याची माहिती होईल; मात्र काँग्रेसने सर्वाधिक काळ देशावर सत्ता राबवतांना हिंदूंना त्यापासून वंचित ठेवले आहे, हे गेहलोत का सांगत नाहीत ?
  • हिंदूंच्या खर्‍या संतांना ठार मारण्याचा प्रयत्न काँग्रेसनेच केला आहे, हा इतिहास आहे ! पू. करपात्रीजी महाराज यांनी वर्ष १९६६ मध्ये देहलीत काढलेल्या गोरक्षण मोर्च्यावर काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गोळीबार करण्याचा आदेश देऊन शेकडो गोरक्षकांची हत्या केली होती, हे हिंदू विसरलेले नाहीत !
  • योगऋषी रामदेवबाबा यांच्यावर देहलीतील रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या वेळी अमानुष लाठीमार करून त्यांच्या भक्तांना काँग्रेसनेच मारहाण केली होती !
  • पू. आसारामजी बापू यांना कारागृहात टाकण्यामागे काँग्रेसचेच षड्यंत्र आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना हिंदूंच्या संतांविषयी बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही !

निकालापूर्वी पू. बापूजी यांच्या चेहर्‍यावर निराशा नव्हती ! – कारागृह अधीक्षक

सकाळी निकालापूर्वी कारागृहातपू. बापूजी अत्यंत आशावादी वाटत होते. त्यांच्या चेहर्‍यावर कोणतीही निराशा नव्हती. काल मी जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी ‘उद्या न्यायालय किती वाजता निकाल देणार आहे ? सर्व सिद्धता झाली आहे ना ?’, असे विचारले होते, असे कारागृह अधीक्षक विक्रम सिंह यांनी सांगितले.

प्रभु रामचंद्राने जे लिहून ठेवले, तेच होईल !- निकालापूर्वी पू. बापूजी यांचे उत्तर

पू. बापूजी सकाळी न्यायालयात आल्यावर त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी निकालाविषयी विचारणा केली. त्या वेळी पू. बापूजी यांनी, ‘प्रभु रामचंद्राने जे लिहून ठेवले, तेच होईल’, असे शांतपणे सांगितले. पू. बापूजी न्यायालयात येतांना अत्यंत शांत दिसत होते. रात्रभर त्यांनी चांगली झोप घेतली. सकाळी लवकर उठून प्रार्थना केली.

राजस्थान उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार ! – प्रवक्त्या नीलम दुबे

न्यायालयाच्या निर्णयावर पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी म्हटले की, ‘मीडिया ट्रायल’नंतर पू. बापूजी यांनी इतके धक्के सहन केले आहेत की, आता धक्केही त्यांच्यापासून दूर जाऊ लागले आहेत. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करतो. तरीही या निर्णयाला आम्ही राजस्थान उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार आहोत.

(म्हणे) ‘आसारामला शिक्षा झाली, संभाजी भिडे, सनातनचे जयंत आठवले वगैरेंना कधी होणार ?’

हिंदुद्वेषी पत्रकार निखिल वागळे यांची ‘ट्वीट’ करून गरळओक !

मुंबई – विविध वृत्तवाहिन्यांवरून पदच्युत झालेले पत्रकार निखिल वागळे यांनी पू. बापूजी यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर ‘आसारामला शिक्षा झाली, संभाजी भिडे, सनातनचे जयंत आठवले वगैरेंना कधी होणार ?’ असे ‘ट्वीट’ केले आहे. (राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणार्थ अहोरात्र निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणारे पू. संभाजी भिडेगुरुजी आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली पाहिजे, हेही निखिल वागळे यांनी स्पष्ट करावे. संतांना शिक्षा होण्याची मनीषा बाळगणारे आणि त्याचा आसुरी आनंद घेणारे निखिल वागळे संतद्वेषीच होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *