भाईंदर (जिल्हा ठाणे) : राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदु युवक-युवती यांनी धर्मशिक्षण घेऊन संस्कारक्षम व्हावे, तसेच नियमित व्यायाम करून आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन प्रतिकारक्षम बनावे, तसेच साधनेची जोड देऊन स्वतःतील आध्यात्मिक बळ वाढवावे, यासाठी २२ एप्रिलला येथील भाईंदर सेकंडरी स्कूलमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु युवा शिबीर’ घेण्यात आले. शिबिराला युवावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये जीवनात साधनेचे महत्त्व, प्रथमोपचार प्रशिक्षण, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले होते. व्यायामाचे काही प्रकार आणि कराटे प्रशिक्षणाच्या काही कृतीही या वेळी करवून घेण्यात आल्या.
या वेळी प्रथमोपचार प्रशिक्षणाच्या अंतर्गत रुग्णाला योग्य प्रकारे कसे उचलावे, वैद्यांपर्यंत नेण्यापूर्वी त्याला मानसिक आधार कसा द्यावा अशा विविध गोष्टी शिकवण्यात आल्या. सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी सर्वांना आजच्या काळात ‘लव्ह जिहाद’सारख्या वाढत्या धोक्यांपासून आपले रक्षण होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी भाईंदर सेकंडरी शाळेने सभागृह आणि पटांगण विनामूल्य उपलब्ध करून दिले. तसेच हे शिबीर यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी सर्वश्री सुभाष सावंत, दयानंद किलचे, दीपक किलचे, सुकेश शुक्ला, दत्तात्रय भट आणि सौ. साधना भट या धर्मप्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘असे शिबीर भाईंदरमध्ये प्रथमच झाले आहे. असे नियमित होत राहिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य आम्ही करू’, असे त्यांनी सांगितले.