मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करणे, हे केंद्रशासनाचे कर्तव्य आहे; कारण जगात बहुसंख्यांकांच्या संस्कृतीलाच राष्ट्राचा आधार मानण्यात आले आहे. त्याप्रमाणे बहुसंख्यांकांचा धर्मच राष्ट्रीयतेचा आधार असावा, हीच जागतिक स्थिती आहे आणि भारतातही असेच असायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि भागवंती सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ते बोलत होते.
या वेळी सनातन धर्माची राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठापना झाल्यावरच भारताचा सर्वतोपरी उत्कर्ष होणार आहे, या गोष्टीवर चर्चासत्रातील वक्त्यांनी जोर दिला. केंद्र सरकारचे माजी सांस्कृतिक सल्लागार प्रा. रामेश्वर मिश्र म्हणाले, ‘‘युरोपातील प्रत्येक राष्ट्र कोणत्या ना कोणत्या ख्रिस्ती पंथाचे अधिकृत संरक्षक आहे. प्रत्येक मुसलमान देश इस्लामचा संरक्षक आहे आणि प्रत्येक बौद्ध देश बौद्ध धर्माचा अधिकृत संरक्षक आहे. अशाच प्रकारे भारत सरकारनेही सनातन धर्माला संरक्षण द्यावे, तसेच येथील शिक्षण अन् न्यायव्यवस्था यांमध्येही सनातन धर्मातील परंपरांचा आधार घेऊन त्याची रूपरेषा निश्चित करावी.’’ या चर्चासत्राला श्री. सत्यपाल शर्मा आणि डॉ. एम्. के. तनेजा यांनीही संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजीव शर्मा यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. प्रीती चौधरी यांनी केले. या चर्चासत्राला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.