पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदु निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे ! – हिंदु धर्माभिमान्यांची केंद्र सरकारकडे मागणी
वाराणसी : पाकिस्तानमध्ये हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करणे, त्यांच्यावर जीवघेणे आक्रमण करणे, हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांच्याशी निकाह लावणे, हिंदु मुलींवर बलात्कार करणे, हिंदूंची भूमी हडपणे, मंदिरांची तोडफोड करून मूर्तींची विटंबना करणे आदी गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे तेथील हिंदूंचे जीवन अतिशय असुरक्षित बनले आहे. अशा स्थितीत पाकिस्तानातून मोठ्या संख्येने निर्वासित बनून हिंदू भारतात येत आहेत. या निर्वासितांना पिटाळण्याचे काम भारताच्या प्रशासकीय यंत्रणा करत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच निर्वासितांना भारताचे दीर्घकालीन पारपत्र न मिळाल्यामुळे पाकिस्तानात परत जावे लागले. त्यानंतर त्यांच्यापैकी ५०० हिंदूंचे पाकिस्तानच्या सिंध प्रांतात धर्मांतर करण्यात आले. अशा स्थितीत भारत सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदु निर्वासितांना मूलभूत सुविधा पुरवाव्या, कोणत्याही परिस्थितीत त्यांना पाकिस्तानात परत पाठवू नये, तसेच त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील शास्त्रीघाटावर १८ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या समवेतच सरकारने अल्पसंख्यांकांसाठी बँकांमध्ये वेगळ्या ‘काऊंटर’ची सुविधा देऊन धार्मिक भेदभाव करू नये, अशीही मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये हिंदु जागरण मंचाचे संयोजक श्री. रवि श्रीवास्तव, ‘इंडिया विथ विझडम्’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, ‘इंडिया विथ विझडम’्चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता अवनीश राय, सूर्यकुंड कमल संंघटनेचे श्री. विश्वनाथ, हिंदु युवा शक्तीचे क्षेत्रीय महामंत्री श्री. शुभम शुक्ला, श्री. सचिन दुबे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी आदी सहभागी झाले होते.