पुणे : आळंदी येथे २४ एप्रिल या दिवशी विठ्ठल परिवाराचा ५वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. आळंदी देवाची येथील माणिकचंद सभागृह येथे ह.भ.प. जनार्दन महाराज गावंडे आणि परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामध्ये वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी विठ्ठल कथा सांगितली. श्रीविठ्ठलाचे नामस्मरण पोहोचावे, तसेच नाम ही एक दैवी शक्ती असून सद्बुद्धी, स्वधर्म यांचे महत्त्व सर्वांना कळावे, सर्वांमध्ये विठ्ठलभक्ती निर्माण व्हावी, असा या सोहळ्यामागील हेतू होता. वारकरी शिक्षण संस्थेनेही या सोहळ्याच्या नियोजनात सहभाग घेतला. या वेळी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, ह.भ.प. तात्या महाराज आणि अन्य वारकरी उपस्थित होते. सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ह.भ.प. शांतीब्रह्म मारूती महाराज कुर्हेकर, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे आणि ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या वर्धापनदिनाच्या औचित्याने सभागृहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारक, तसेच धार्मिक कृतींच्या माहितीचे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २०० हून अधिक धर्माभिमान्यांनी लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. फलक प्रदर्शन लावण्याची अनुमती मिळवण्यासाठी ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी यांनी सहकार्य केले.
२. ‘असे प्रदर्शन सर्वच ठिकाणी लावावे. लोकांना शास्त्राप्रमाणे धार्मिक कृती कशा कराव्यात, हे या प्रदर्शनातून समजेल’, असे अनेक वारकर्यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात