सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये हिंदूंच्या मंदिरांचा पैसा वापरण्याचा निर्णय त्वरित रहित करावा : नंदुरबार येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी !
नंदुरबार : सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये हिंदूंच्या मंदिरांचा पैसा वापरला जात आहे तो त्वरित रहित करावा, अशी मागणी नंदुरबार येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २९ एप्रिल या दिवशी नेताजी सुभाष चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देऊ नये आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक आक्रमणाचा निषेध करावा, याही मागण्या या वेळी करण्यात आल्या.
हिंदुत्वनिष्ठ श्री. दिलीप ढाकणे-पाटील या वेळी म्हणाले, ‘‘मंदिरांच्या पैशांवर डोळा ठेवून तो सामूहिक विवाह सोहळ्यासाठी वापरला जात आहे, हे अतिशय निंदनीय आहे.’’ धर्मप्रेमी श्री. जितेंद्र मराठे यांनी लिंगायत समाजाविषयी त्यांचेे मनोगत व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनीही या वेळी टी. राजासिंह यांच्यावर झालेल्या भ्याड आक्रमणाचा निषेध नोंदवला. या वेळी सर्वश्री कमलेश मोची, प्रज्ञेश होळकर, प्रशांत दातीर, संदेश मराठे, शुभम कलाल, विजय जोशी आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. आकाश गावित यांनी केले.