कोल्हापूर : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजे ७ मे या दिवशी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ३ मे या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या येथील करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीला सकाळी ११ वाजता मंदिरात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि भाविक यांच्या वतीने भावपूर्ण साकडे घालण्यात आले. या वेळी उपस्थितांपैकी अनेकांची भावजागृती झाली.
प्रार्थनेनंतर हिंदुत्वनिष्ठांकडून श्री महालक्ष्मीदेवी आणि हिंदु राष्ट्र यांचा जयघोष करण्यात आला, तसेच ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हिंदु धर्माचा विजय असो’ आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या.
‘भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने त्यांचा महामृत्यूयोग टळावा, त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम रहावे, सर्व हिंदु धर्माभिमान्यांचे आपत्काळात रक्षण व्हावे, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण व्हावे, त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, तसेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय कार्यान्वित व्हावे’, यासाठी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांनी साकडे घातले.
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, वडर समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू सांगावकर, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष श्री. मनोहर सोरप, महिला आघाडीच्या श्रीमती सुवर्णा पोवार, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे शहराध्यक्ष श्री. शरद माळी, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रमोद सावंत, गोविंद देशपांडे, देवराज सहानी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, मधुकर नाझरे आदी मान्यवर उपस्थित होते.