Menu Close

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री अंबाबाईदेवीच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ठिकठिकाणी हिंदु राष्ट्रजागृती अभियान !

श्री अंबाबाईला प्रार्थना करून साकडे घालतांना हिंदुत्वनिष्ठ

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) : सनातन संस्थेचे संस्थापक आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी ७ मे २०१८ या दिवशी झाला. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ४ मे या दिवशी हुपरी येथे श्री अंबाबाईदेवीला सायंकाळी ७.३० वाजता श्री अंबाबाई मंदिरात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्या वतीने भावपूर्ण साकडे घालण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या हातकणंगले तालुकाप्रमुख सौ. उषा संजय चौगुले, महिला आघाडीच्या हुपरी शहरप्रमुख सौ. मीना शशिकांत जाधव आणि सौ. वैशाली नीळकंठ माने यांनी देवीची खण आणि नारळ यांनी ओटी भरली.

‘भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांंचा महामृत्यूयोग टळावा, त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम रहावे, सर्व हिंदु धर्माभिमान्यांचे आपत्काळात रक्षण व्हावे, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण व्हावे, त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, तसेच महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय कार्यान्वित व्हावे’, यासाठी श्री अंबाबाईदेवीच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांनी साकडे घातले. हिंदुत्वनिष्ठांनी देवीला सामूहिक प्रार्थना केली.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

शिवसेनेचे श्री. राजेंद्र पाटील, शिवसेनेचे हुपरी शिवसेना ग्राहक कक्ष तालुकाप्रमुख श्री. संजय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख श्री. गणेश कोळी, शिवसेनेचे युवा सेना शहरप्रमुख श्री. विक्रम सावंत, उपशहरप्रमुख सर्वश्री नितीन काकडे, विजय जाधव, दीपक बेडगे, विजय शिंदे, शिवसैनिक श्री. राजेंद्र पाटील, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सर्वश्री नीळकंठ माने, प्रवीण पाटील, दीपक तुपे, शुभम दैने, स्वराज देसाई, अक्षय शिंदे, यशवंत मिठारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, सनातन संस्थेचे श्री. सचिन कौलकर

वैशिष्ट्यपूर्ण

हिंदुत्वनिष्ठ श्री अंबाबाईदेवीला साकडे घालून प्रार्थना करत असतांना त्याच वेळी तेथे श्री बिरोबा देवाची पालखी वाजत गाजत आली. त्यामुळे ‘श्री बिरोबा देवाचीही उपस्थिती होती’, अशी अनुभूती हिंदुत्वनिष्ठ आणि भक्त यांना आली.

पुण्यातील भवानीपेठेतील भवानीमाता मंदिरात साकडे !

देवीच्या चरणी संस्कृत आणि मराठी या भाषांतून प्रार्थना

श्री भवानीमातेला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घालतांना धर्माभिमानी

पुणे : येथील भवानी पेठेतील पुरातन भवानीमाता मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी देवीला साकडे घालण्यात आले. धर्माभिमानी श्री. विभूषण कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी यांनी देवीची प्रार्थना करून पुष्पहार अर्पण केला, तसेच देवीची ओटी भरली. त्यानंतर मंदिराचे व्यवस्थापक श्री. नरेंद्र मेढेकरगुरुजी यांनी देवीच्या चरणी प्रथम संस्कृतमधून आणि नंतर मराठीतून प्रार्थना केली. या प्रसंगी धर्माभिमानी श्री. अशोक केडगे, श्री. बाळासाहेब ओझरकर, तसेच सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

भोसरी येथील नवशक्ती बालाजी ग्रुपच्या छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या गणेश मंदिरात साकडे घालतांना धर्माभिमानी

भोसरी येथील नवशक्ती बालाजी गटाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या गणपती मंदिरामध्ये साकडे घालण्यात आले. नवशक्ती बालाजी गटाचे सर्वश्री सूर्यकांत भोसले, भगवान फुगे, संतोष धर्मावत आणि अन्य कार्यकर्ते यांच्यासह, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही उपस्थित होते. चिंचवड येथील धनेश्‍वर मंदिरात, तसेच प्रेमलोक पार्क येथील गणेश मंदिरातही साकडे घालण्यात आले.

मुंबईत भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम यांना साकडे

धारावी येथील श्रीराम मंदिरात साकडे घालतांना धर्मप्रेमी

मुंबई : शीव येथील मुरलीधर मंदिरात श्रीकृष्णाला साकडे घालण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी, भाविक, विद्यार्थी, तसेच पुरोहित सहभागी झाले. पुरोहित श्री. नारायण धूपकर यांनी संकल्प केला. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी उपस्थितांकडून ११ वेळा महामृत्यूंजय मंत्राचा जप करून घेतला.

साकडे घालतांना एक महिला भाविक म्हणाल्या, ‘‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होणारे धर्मप्रेमी आणि कार्यकर्ते यांच्या अडचणी दूर होण्यासाठी मी प्रार्थना करीन.’’

१ मे या दिवशी धारावी येथील श्रीराम मंदिरात साकडे घालण्यात आले. मंदिर पदाधिकारी श्री. क्रांतीभाई पटेल आणि श्री. महेश बालकोटी तसेच बजरंग दलाचे श्री. कृष्णा आणि सहकारी, धर्मप्रेमी उपस्थित होते. त्यांनी माहिती अधिकार कायद्याची कार्यशाळा घेण्यास सांगितले.

नंदुरबार येथे गणपति मंदिर आणि साईबाबा मंदिर येथे साकडे घातले

साईबाबा मंदिरात साकडे घालतांना धर्माभिमानी

नंदुरबार : येथील श्री गणपति मंदिर आणि साईबाबा मंदिर, लालबाग वसाहत येथे भाविकांनी साकडे घातले. या वेळी गणपति मंदिरात ७२ भाविक, तर साईबाबा मंदिरात ८४ भाविक उपस्थित होते. भाविकांकडून प्रार्थनाही करवून घेण्यात आली. साकडे घालतांना हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आणि आकाश गावित उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *