वणी (यवतमाळ) : येथील तहसील चौकात २८ एप्रिलला ४ ते ६ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुढील विषय मांडण्यात आले.
पाकमधील निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्याविषयीची आग्रही मागणी श्री. लहू खामणकर यांनी या वेळी केली. भाविकांनी श्रद्धेने मंदिरांमध्ये अर्पण केलेले धन सामुदायिक विवाहांवर खर्च करणे हा भाविकांचा अपमान आहे, असे मत श्री. लोभेश्वर टोंगे यांनी मांडले. कोरेगाव भीमा प्रकरणातील ‘महाराष्ट्र बंद’मुळे झालेली सार्वजनिक मालमत्तेची हानी आयोजक प्रकाश आंबेडकर यांचेकडून वसूल करावी, अशी मागणी सौ. कल्पना खामणकर यांनी केली. कर्नाटक सरकारने ‘लिंंगायत’ समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून दिलेली मान्यता रहित करण्याविषयीची मागणी सौ. अरुणा ठाकरे यांनी केली. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात महिला पुजारी नेमून सहस्रो वर्षांची परंपरा, कोणत्याही हिंदु धर्माचार्यांच्या संमतीविना मोडीत काढू नये, अशी मागणी सौ. मंदा पारखी यांनी केली.
या आंदोलनाला उपस्थित गोरक्षकांपैकी श्री. कल्याण पांडे यांनी विषयही मांडला. श्रीराम गोरक्षणचे सर्वश्री नरेश निकम, कपील कुंटलवार, अमोल दोरखंडे, सचिन जोशी, कामेश त्रिवेदी, भारत निमसटकर आणि राहुल रोडे यांचा सक्रीय सहभाग होता. या वेळी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेत २०० जणांनी स्वाक्षर्या केल्या. या आंदोलनात समाजातील हिंदूही सहभागी झाले होते.