किल्ले सिंहगड येथे सामूहिक स्वच्छतेसाठी हिंदुत्वनिष्ठ एकवटले !
पुणे : किल्ले सिंहगड (पुणे) येथे शिवप्रेमी-दुर्गप्रेमी, सनातनचे हितचिंतक, नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक, हिंदु धर्माभिमानी यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ६ मे या दिवशी सकाळी सामूहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांविषयी युवांमध्ये अभिमान निर्माण व्हावा, तसेच गडकोटांचे संवर्धन, मावळ्यांच्या बलीदानाचे स्मरण रहावे आणि स्वराज्यात मोलाचा वाट असलेल्या गडांविषयी मान राखला जावा, असा या मोहिमेचा हेतू होता. या वेळी सर्वांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचा परिसर आणि अमृतेश्वर मंदिर या ठिकाणी स्वच्छता केली. या मोहिमेत २५ धर्माभिमानी युवक-युवती उपस्थित होते.
शिवछत्रपतींच्या वास्तूंची स्वच्छता आणि संवर्धन हीच त्यांना खरी श्रद्धांजली ! – अमोल भोंडवे
स्वच्छता मोहीम पाहून गडावर आलेले शिवप्रेमी श्री. अमोल भोंडवे यांनी सर्व धर्मप्रेमींचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘मोहीम पाहून पुष्कळ चांगले वाटले. शिवछत्रपतींच्या वास्तूंची स्वच्छता, जीर्णोद्धार आणि संवर्धन हीच शिवछत्रपतींना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे. शिल्प, स्मारके उभारण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या पुरातन ऐतिहासिक वास्तूंची निगा राखणे, संवर्धन करणे हे श्रेयस्कर आहे. तुमच्या कार्याला माझे अभिवादन ! ’’
क्षणचित्रे
१. धर्माभिमानी सर्वश्री सूरज चोरघे, गणेश पवार, प्रसाद महाडिक, समीर रानवडे, रामय्या कलाल, आकाश जगदणे, आशिष कौर, कु. कार्तिकी जगताप आणि कु. तनया जगताप यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
२. श्री. समीर रानवडे यांनी त्यांच्या व्यस्ततेतून स्वतःचे चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले. ‘वसुंधरा फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम पाहून स्वतःहून स्वच्छतेसाठी साहाय्य केले.
३. सर्वांनी ‘अशी मोहीम पुन्हा व्हावी. त्या वेळी आम्ही सर्व येऊ’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले. परात्पर गुरुदेव यांच्या चैतन्यामुळे संपूर्ण मोहिमेत उन्हाचा त्रास जाणवला नाही. ‘ही कृती गुरुदेवच करवून घेत आहेत’, असे सर्वांना जाणवले.