हिंदूसंघटनासाठी व्यक्तीगत अहंकार बाजूला ठेवा ! – पू. डॉ. चारूदत्त पिंगळे
Share On :
देहली येथे राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन
नवी देहली : हिंदूंना संघटित होण्याचा शाप आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक शापाला उप:शापही असतो. जर हिंदूंनी व्यक्तीगत आणि संघटनात्मक अहंकार अन् संकुचितपणा बाजूला ठेवला, तर हिंदूंचे संघटन लांब नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी केले. येथील श्रीनिवासपुरी येथील भारत सेवाश्रम संघाच्या भवनमध्ये १९ आणि २० डिसेंबर हे दोन दिवस राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर भारत सेवाश्रम संघ, भोपाळचे सचिव स्वामी अर्पितानंद, वेदिक उपासना पीठाच्या संस्थापिका पू. तनुजा ठाकूर आणि फेथ फाऊण्डेशनचे अध्यक्ष कर्नल अशोक किणी उपस्थित होते. या वेळी संत आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात आला.
पू. पिंगळे पुढे म्हणाले, संघटनेचे कार्य वेगवेगळे असू शकते; पण आपण राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या प्रत्येकाला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचा अनादर करता कामा नये. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, तो माझ्या राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी करत आहे. जेव्हा धर्मासाठी कार्य करणार्या प्रत्येकाचे मन आणि हृदय एक होऊन ते धर्मबंधू म्हणून वावरतील, त्या वेळी नक्कीच आपण हिंदुराष्ट्राच्या दृष्टीने मार्गक्रमण करू.
हिंदुत्वाविषयी भाव जागृत होण्यासाठी साधना आवश्यक ! – पू. तनुजा ठाकूर
या अधिवेशनाच्या माध्यमातून भारताची राजधानी देहलीत भगवा ध्वज फडकत आहे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला, त्या वेळी आध्यात्मिक तेज असणारी एक जरी संघटना असती, तर भारताला आजची अवकळा आली नसती. आज हिंदु असण्याचा अभिमान बाळगणारे अनेक आहेत; पण त्यातील अतिशय अल्प जण त्यांच्या अभिमानाची कारणे सांगू शकतात. ही स्थिती पालटण्यासाठी आम्हाला धर्मशिक्षण घ्यायला हवे. आज हिंदू केवळ संकटांच्या निवारणासाठी धर्माकडे बघतात; पण धर्म तुम्हाला शाश्वत आनंद देऊ शकतो, तो जगून तर पहा ! हिंदुत्वाविषयी जर खरोखर प्रेम असेल, तर आपण निष्काम भावनेने कार्य केले पाहिजे आणि हा भाव जागृत होण्यासाठी साधना करणे अपरिहार्य आहे. मनुष्यजन्म दुर्लभ आहे. त्यामुळे साधना करून भक्ती वाढवा. ज्या श्रीकृष्णाने गजेंद्राला मोक्ष दिला, तो आपला उद्धार करून धर्मसंस्थापनेसाठी का नाही येणार ?
एन्.सी.ई.आर.टी.च्या अभ्यासक्रमात आद्य शंकराचार्यांविषयी केवळ २ ओळी – कर्नल किणी
वैदिक धर्मावरील आघात रोखण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी प्रयत्न केले. आज एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात त्यांच्याविषयी केवळ २ ओळी दिल्या आहेत, हे दुर्दैव आहे. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या मठांमध्ये आज वेदांचे अध्ययन करणार्यांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. एका मठात तर वेदाचे अध्ययनही चालू नाही, हे क्लेषदायक आहे. देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तान इस्लामिक राज्य झाले. भारताला मात्र निधर्मीवादात अडकवून धर्मापासून दूर नेण्याचा प्रयत्न झाला; पण या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला सनातन संस्कृती पुन्हा जागृत करायची आहे.
धर्म न टिकवल्याने हिंदूंचे भारतातील अस्तित्व संकटात ! – स्वामी अर्पितानंद
या हिंदु अधिवेशनाच्या व्यासपिठाचा मी साक्षीदार असल्याविषयी मला अभिमान वाटत आहे. आज हिंदूंकडे बौद्धिक, भौतिक, सांस्कृतिक सर्व प्रकारची संपन्नता आहे; पण संघटनाचा अभाव या एका दुर्गुणामुळे हिंदूंची हानी होत आहे. हिंदु हा एकमेव धर्म आहे, जो सर्वांना आनंदी जीवन देऊ शकतो; पण दुर्दैवाने यासाठी कार्य करणार्यांना आज सांप्रदायिक म्हणून हिणवले जात आहे. हिंदूंचे दूरदूरपर्यंत राज्य होते; पण धर्म न टिकवल्याने आज हिंदूंचे भारतातील अस्तित्व संकटात आले आहे. त्यामुळे देहलीतील करोडपतींनी या भ्रमात राहू नये की, धर्माच्या आधाराशिवाय आपण येथे सुखी राहू.