Menu Close

महाराष्ट्र : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेले हिंदु राष्ट्रजागृती अभियान

सनातन संस्थेचे संस्थापक आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी ७ मे या दिवशी मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवतांना साकडे घालणे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ठिकठिकाणी उपक्रम राबवण्यात आले.

पुणे

पिंपरीमधील संत तुकारामनगर येथील शिवमंदिर आणि गणेशमंदिर येथे साकडे !

५ मे या दिवशी संत तुकारामनगर येथील शिवमंदिर आणि गणेशमंदिर येथे भगवान शिव आणि श्री गणेश यांना साकडे घालण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अवघडे यांच्या हस्ते आरती करून श्रीफळ वाढवण्यात आले. मंदिराचे पुजारी श्री. पुरोहित गुरुजी यांनी आरतीला उपस्थित असणार्‍या भाविकांना साकडे घालण्यासाठी अन् प्रार्थना करण्यासाठी थांबण्याचे आवाहन केले. प्रार्थना झाल्यावर श्री. पुरोहित गुरुजी कृतज्ञताभावाने म्हणाले, ‘‘प्रार्थनेसाठी सर्व जण उपस्थित राहिले, याचा मला आनंद झाला. प.पू. गुरुदेवांना दीर्घायुष्य लाभणारच आणि त्यांचे ध्येय देवाच्या कृपेने लवकरच साकार होणार.’’

प.पू. गुरुदेवांना दीर्घायुष्य लाभण्याची मनोकामना व्यक्त करणारे पिंपरीचे भाजप शहराध्यक्ष !

पिंपरीचे भाजप शहराध्यक्ष श्री. शीतल कुंभार यांनी ‘प.पू. गुरुदेवांना दीर्घायुष्य लाभावे’, अशी मनोकामना व्यक्त करून ‘हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणे, हेच एक हिंदू म्हणून आपले कर्तव्य आहे’, असे ते म्हणाले. या प्रसंगी सौ. लक्ष्मी खड्यांकर आजींनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अवघडे यांच्या डोक्यावर हात ठेवून ‘हिंदु राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार’, असा आशीर्वाद दिला. समितीचे कार्यकर्ते, धर्माभिमानी श्री. केशव कुकडे, अनिल देशपांडे, माणिकराव बारगळ, श्री. वाबळे, शिरीष कोल्हे, साखरे गुरुजी यांच्यासह १७-१८ भाविक या प्रसंगी उपस्थित होते.

वडगाव येथील श्री महालक्ष्मी मंदिरात साकडे घालण्यासाठी मंदिराच्या प्रमुखांचा सकारात्मक प्रतिसाद !

येथे साकडे घालण्यासाठी मंदिराचे प्रमुख आणि राजमाता जिजाऊ नवरात्रोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष श्री. हरिश्‍चंद्र अण्णा दांगट भेटल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यासाठी ‘देवीला अभिषेकही घालूया’, असे सुचवले. मंदिराचे पुजारी श्री. देवेंद्र शूर गुरुजी यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांच्याकडून संकल्प करवून घेऊन देवीची पंचोपचार पूजा केली. साकडे घालण्यासाठी मंदिर परिसरात उपस्थित भाविकांना गाभार्‍याजवळ बोलावले आणि त्यानंतर सर्वांनी मिळून प्रार्थना केली. ‘सनातन प्रभात’चे वाचक असलेल्या श्री. शूर गुरुजी यांनी स्वतःहूनच उत्स्फूर्तपणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य, तसेच हिंदु राष्ट्राची आवश्यकता यांविषयी उपस्थितांना उत्स्फूर्तपणे आणि तळमळीने माहिती दिली.

जुन्नर येथील श्री विठ्ठल मंदिरातही साकडे घातले !

६ मे या दिवशी जुन्नरमधील सराई पेठेतील विठ्ठल मंदिराचे पुजारी, तसेच सनातनचे हितचिंतक आणि विज्ञापनदाते श्री. मुकुंद राक्षे यांनी श्रीफळ वाढवून श्री विठ्ठलाला साकडे घातले. ‘साकडे घालण्याची सेवा करायला मिळाली, हे माझे भाग्य आहे. मी ऋणी आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सनातनच्या साधकांसह ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. अनिल भगत, श्री. महेश भगत, श्री. वैभव भगत, श्री. शशिकांत वराडी हे या वेळी उपस्थित होते.

शिवणे येथील भैरवनाथ मंदिर

येथेही साकडे घालतांना समितीच्या कार्यकर्त्यांसह श्री. विष्णू शिवणकर, श्री. माधव शिवणकर, डॉ. शेळके आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांना मंदिरात साकडे घालत असल्याविषयी सांगितल्यावर ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

देवाची उरळीफाटा येथील श्री गणेश मंदिर

येथे साकडे घालतांना ह.भ.प. चंद्रकांतअप्पा महाराज शिंदे, ह.भ.प. आवताडे महाराज यांसह अन्य वारकरी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. महाराजांनी तेथे धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली, तसेच समितीचे उपक्रम राबवण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. दुसर्‍याच दिवशी तेथे समितीच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचनही झाले.

राजगुरुनगर येथील लिखिते गणेश मंदिरातही साकडे घालण्यात आले.

शिरवळ (जिल्हा सातारा) येथे श्री अंबिकामाता मंदिरात साकडे घालण्यासाठी धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांचा पुढाकार !

५ मे या दिवशी शिरवळ येथील ग्रामदेवी श्री अंबिकामाता मंदिरात साकडे घालण्यात आले. ‘सनातन प्रभात’चे वाचक, शिरवळ आणि पिसाळवाडी येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी असे १८-२० जण या प्रसंगी उपस्थित होते. धर्मशिक्षणवर्गातील श्री. संंकेत पिसाळ आणि श्री. सागर जरांडे यांनी पुढाकार घेऊन साकडे घालण्यासाठी सर्व धर्माभिमान्यांना एकत्र केले.

कोल्हापूर

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

कोल्हापूर – ३ मे या दिवशी उचगाव येथे शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या घरी आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर श्रीमती साधना पट्टणशेट्टी यांनी प्रवचन घेतले. याचा लाभ १२ धर्मप्रेमी महिलांनी घेतला.

शिरोली (जिल्हा कोल्हापूर)

ग्रामदैवत श्री बिरदेवाच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

६ मे या दिवशी येथील श्री बिरदेव मंदिरात श्री बिरदेवाला सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्या वतीने भावपूर्ण साकडे घालण्यात आले. या वेळी ४० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. हिंदुत्वनिष्ठांनी देवाला सामूहिक प्रार्थना केली.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ : शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य श्री. महेश चव्हाण, शिवसेनेचे ग्राहक संरक्षण जिल्हाप्रमुख श्री. दीपक यादव, शिरोली तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. सतीश पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. अण्णा साळोखे, हिंदू संग्रामसेना तालुकाप्रमुख श्री. विक्रम पार्टे, श्री संप्रदायाचे श्री. श्रीराम खवरे, सौ. दीपाली सुतार, सौ. कोळी, ग्रामपंचायत सदस्य श्री. हरी पुजारी, हिंदुत्वनिष्ठ श्री. विश्‍वास गावडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सनातन संस्थेचे डॉ. सुरेश आनंदे

मिरज

येथील अंबामाता मंदिरात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या पुजारी श्रीमती सत्यभामा उपाख्य माई वायचळ यांनी श्री अंबामाता देवीला साकडे घातले. या वेळी १५ धर्मप्रेमी महिला उपस्थित होत्या. तासगाव वेस मारुति मंदिरात पुजारी श्री. विनायक प्रताप राजपूत यांनी, तर गर्डर विठ्ठल मंदिरात पुजारी श्री. गोपाळ वायचळ यांनी साकडे घातले. दोन्ही ठिकाणी ८ धर्मप्रेमी उपस्थित होते. सुभाषनगर येथील सिद्धारूढ मठ येथे मंदिर स्वच्छता करण्यात आली. यात श्रीमती मैनाबाई महादेव रामगुडे, सौ. मीनाक्षी प्रदीप मगदूम, श्री. दत्ता गोपाळ विभूते, चि. दुर्गा प्रदीप मगदूम, सौ. संजीवनी कदम सहभागी झाल्या होत्या. २ मे या दिवशी विश्रामबाग (सांगली) येथे सौ. संगीता लिमकर यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन घेतले. १५ महिलांनी याचा लाभ घेतला.

सोलापूर

सोलापूर येथे विविध मंदिरात साकडे

मल्लिकार्जुन मंदिर येथे धर्मप्रेमींच्या वतीने साकडे घालण्यात आले, तर अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील यशवंतनगर मारुति मंदिर येथे साकडे घालण्यात आले. धर्मप्रेमींचा सहभाग उल्लेखनीय होता.

येथील अकलाई मंदिर येथे सौ. अंजली अरगडे यांनी देवीची खण-नारळाने ओटी भरली. त्यानंतर पुजारी आणि उपस्थित भाविक यांनी भावपूर्ण संकल्प केला. या वेळी श्री. सागर देशमाने, श्री. शिवाजी घोडके, श्री. श्रीपाद अरगडे यांसह भाविक उपस्थित होते.

विशेष : अकलाई मंदिरातील देवीच्या पुजार्‍यांचे कुटुंबीय विविध ठिकाणी मंदिरांत पुजारी म्हणून सेवा करतात. त्यांनी कुटुंबियांना ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून साकडे घालण्यासाठी प्रार्थना पाठवली आणि अन्य मंदिरांत साकडे घालण्यास सांगितले. त्यांनी ‘४ दिवसांनी देवीची मोठी पूजा आहे, तेव्हा परत आम्ही देवीला साकडे घालतो,’ असेही सांगितले.

फरीदपूर (जिल्हा बरेली) येथे साकडे घालतांना भाविकांचाही सहभाग

सोलापूर येथून यात्रेला गेलेल्या साधकांनी फरीदपूर (जिल्हा बरेली) येथील मेन रोड, सनातन धर्मसत्संग भवन येथे ४५ हून अधिक भाविकांसह साकडे घातले.

चोपडा (जळगाव)

मंदिर स्वच्छतेनंतर श्री आनंदी भवानीदेवी आणि नवग्रह यांच्या चरणी साकडे !

येथील श्री आनंदी भवानीदेवी मंदिराची, नवग्रह मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी मंदिर परिसरातील ४ महिलांनी स्वतःहून या उपक्रमात सहभाग घेतला. या वेळी सनातन प्रभात नियतकालिकाच्या वाचक सौ. भोई उपस्थित होत्या, तसेच मंदिरातील पूजा करणारे श्री. संतोष पालीवाल आणि सौ. रत्ना पालीवाल यांनी पुष्कळ सहकार्य केले. ‘सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ चांगले आहे’, असे त्यांनी कौतुक केले. देवीच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करून सेवेला आरंभ झाला, तसेच मंदिराची स्वच्छता झाल्यावर शेवटी सामूहिक नामजपही करण्यात आला.

येथील नवग्रह मंदिरात नवग्रह देवता, श्री गणेश, महादेव आणि वीर हनुमान देवांची आरती करून त्यांच्या चरणी साकडे घालण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सनातनचे श्री. भगतसिंग पाटील यांनी या वेळी सपत्नीक आरती केली.

नंदुरबार

नेताजी सुभाषचंद्र बोस स्मारक आणि कामनाथ महादेव मंदिर यांची स्वच्छता

नंदुरबार – येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्मारक आणि श्री कामनाथ महादेव मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली. या वेळी परिसरातील रिक्शाचालक, फळविक्रेते आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. स्वच्छतेनंतर रिक्शा युनियनचे अध्यक्ष छोटू माळी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. उपस्थितांनी अभिवादन केले. या वेळी सर्वश्री सुयोग सूर्यवंशी, दर्शन चव्हाण, सौरभ शाह, करण राजपूत, मयुर चौधरी, आकाश गावित, जितेंद्र राजपूत आदी उपस्थित होते. समितीच्या कार्यकर्त्यांसह धर्माभिमानी हिंदूंनी श्री कामनाथ महादेव मंदिराची स्वच्छता केली.

श्रीरामपूर (नगर)

धर्माभिमान्यांच्या उत्स्फूर्त पुढाकाराने रांजणखोल, ता. राहता (जिल्हा नगर) येथे हिंदु राष्ट्रजागृती सभा पार पडली !

श्रीरामपूर – येथील रांजणखोल येथे धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन केवळ एका दिवसात नियोजन आणि प्रसार करून सभा आयोजित केली. ६ मे या दिवशी घेतलेल्या सभेला ८० ते ९० ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता विशद केली, तसेच एका दिवसात आयोजन करून सभा यशस्वी करणार्‍या ग्रामस्थांचे विशेष अभिनंदनही केले. रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी शौर्यजागरणाची आवश्यकता सर्वांसमोर मांडली. सभेनंतर गावात साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे ठरवण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *