ईश्वरी अधिष्ठान ठेवून आपल्यातील शौर्य गाजवा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती
डोंबिवली : विजयादशमी, नरकचतुर्दशी आदी हिंदूंचे सण हे शौर्यजागरण करणारेच आहेत. शौर्यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाही. देवतांनी आम्हाला शौर्य जागृत करण्यासाठी शस्त्रे दिलेली आहेत. आपल्याला शौर्य जागृत करून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. जेव्हा जेव्हा शौर्य गाजवण्याची वेळ आली, तेव्हा तेव्हा आपण शौर्य गाजवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ईश्वरी अधिष्ठान ठेवून पाच पातशाह्या उद्ध्वस्त करून शौर्य गाजवले. आपल्यालाही ईश्वरी अधिष्ठान ठेवून शौर्य गाजवायचे आहे, असे मार्गदर्शन समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी शौयर्र् जागरणाचा उद्देश आणि आवश्यकता सांगतांना केले. राघवेंद्र स्वामी मठ, कोपर रोड, डोंबिवली पश्चिम येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १५ धर्माभिमानी सहभागी झाले होते. शिबिराचा आरंभ शंखनादाने करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. हेमंत पुजारी यांनी केले. श्री. निरंजन चोडणकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे विचार मांडले, तसेच साधनेविषयीचे मार्गदर्शन श्री. अभिजीत भोजणे यांनी केले.
शिबिरामध्ये दैनंदिन जीवनात आपल्यावर ओढवणार्या प्रसंगात कसा प्रतिकार करावा, तसेच छोट्या छोट्या प्रसंगात आपण स्वरक्षण कसे करू शकतो याविषयीचे प्रकार दाखवण्यात आले, तसेच ते करवूनही घेण्यात आले.
शिबिराची सांगता करण्यापूर्वी सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध रहाण्याची शपथ घेतली.
क्षणचित्रे
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची ध्वनिचित्रफीत या वेळी दाखवण्यात आली.
२. या ठिकाणी क्रांतीकारांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
३. स्वरक्षण प्रशिक्षण करतांना शिबिरार्थी ‘हर हर महादेव’च्या घोषणा देत होते.
४. शिबिरामध्ये ‘ॐ’ चा उच्चार आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’चा नामजप करून घेण्यात आला.
सहभागी धर्मप्रेमींच्या प्रतिक्रिया !
१. स्वरक्षण प्रशिक्षण केल्यानंतर उत्साह जाणवला.
२. स्वरक्षण प्रशिक्षण करतांना इतर वेळेपेक्षा अधिक शक्ती जाणवली.
३. ‘समोर कितीही शत्रू आले तरी लढू शकतो’, असा आत्मविश्वास वाटला.
४. ‘घोषणा देतांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली आणि आम्ही सर्व मावळे आहोत’, असे जाणवले.
५. शौर्य आणि साधना या दोघांचा खरा अर्थ कळला.
पडघा (पनवेल) येथील हनुमान मंदिरात हिंदुत्वनिष्ठांकडून हनुमंताच्या चरणी साकडे !
पनवेल : १२ मे या दिवशी पडघा येथील हनुमान मंदिरात धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी हनुमंताच्या चरणी साकडे घातले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकृष्ण उपाध्ये यांनी हनुमंताच्या चरणी साकडे घालण्याचा हेतू आणि महत्त्व उपस्थितांना सांगितले. त्यानंतर पडघा येथील धर्मप्रेमी, विज्ञापनदाते आणि सनातनचे हितचिंतक श्री. कृष्णा पाटील (माजी सरपंच, पडघा) यांनी हनुमंताच्या चरणी पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारासह साकडे घातले, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मोहिनी मांढरे यांनी हिंदु राष्ट्र जागृती अभियानाची माहिती सांगितली. १३ हिंदुत्वनिष्ठांसह अन्य भक्तही यात सहभागी झाले.
‘या अभियानाच्या अंतर्गत शौर्यजागरण शिबीर आयोजित करावे’, अशी मागणी श्री. श्रीकृष्ण कदम आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. सुनील विश्वनाथ भोईर यांनी केली. या दोघांनी गावातील सभागृह आणि प्रसार यांचे दायित्व घेऊन पुढील बैठक १८ तारखेला निश्चित केली.
क्षणचित्रे
१. श्री. कृष्णा पाटील आणि श्री. सुनील भोईर यांनी ‘गावातील सभागृह यासाठी उपलब्ध करून देऊ. महिला वर्ग उपस्थित रहाण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले.
२. श्री. कृष्णा पाटील यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाची माहिती इतरांना सांगितली.
चंद्रपूर येथील दैवत श्री महाकालीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांच्या चरणी साकडे !
चंद्रपूर : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या वतीने येथील दैवत श्री महाकालीदेवीच्या चरणी साकडे घालण्यात आले. येथील श्री दुर्गा मंदिर, श्री गणेश मंदिर, श्रीराम मंदिर, येथेही साकडे घालण्यात आले.
श्री भवानीमाता मंदिर, हनुमान मंदिर, श्री राधाकृष्ण मंदिर येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जन्मोत्सवाच्या निमित्ताने राबवलेल्या राष्ट्र-धर्मजागृती उपक्रमाच्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने येथील हनुमान मंदिर, श्री दुर्गा मंदिर, श्री गणेश मंदिर, श्रीराम मंदिर, राधाकृष्ण मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात