Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी राबवलेले हिंदु राष्ट्रजागृती अभियान !

ग्रामदैवत सिद्धेश्‍वर देवालय येथे साकडे घालतांना धर्मप्रेमी
गजानन महाराज मंदिर येथे साकडे घालतांना धर्मप्रेमी
शिरोळ येथील भोजनपात्र मंदिर येथे साकडे घालतांना धर्मप्रेमी

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेमधील अडथळे दूर होण्यासाठी जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिद्धेश्‍वर देवालय येथे १३ मे या दिवशी साकडे घालण्यात आले. या वेळी भाजपचे मंडल चिटणीस श्री. राजेंद्र दाईंगडे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शंकरराव कुलकर्णी, तसेच सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते असे २५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

या वेळी श्री. शंकरराव कुलकर्णी म्हणाले, ‘‘साकडे घालणे म्हणजे एकप्रकारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासाठी केलेला महामृत्युंजय यज्ञच आहे. सर्व धर्मप्रेमींचे आयुष्य त्यांना मिळावे, अशी प्रार्थना मी त्यांच्यासाठी करतो.’’   शिरोळ येथील भोजनपात्र मंदिर आणि गजानन महाराज मंदिर येथेही साकडे घालण्यात आले.

धुळे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकांची स्वच्छता

धुळे येथे स्मारकाची स्वच्छता करताना धर्मप्रेमी

धुळे : ‘ज्या क्रांतीकारकांमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले अशा क्रांतीकारकांची स्मारके बांधली जातात; पण त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचा भाग होतो. पण सगळे जरी विसरले असले, तरी आम्ही या क्रांतीकारकांना विसरणार नाही’, हाच भाव मनात ठेवून धुळे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकांची नुकतीच स्वच्छता करण्यात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या अंतर्गत घेण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्रजागृती अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.

या वेळी धुळ्यातील हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून सेवा करणारे धर्मप्रेमी श्री. पियुष खंडेलवाल, श्री. मयूर बागुल, श्री. संजय शर्मा, कु. रौनक महाजन, कु. गणेश माळी, कु. गौरव जाधव आणि श्री. भगवान चव्हाण यांचा या अभियानात सहभाग होता. धुळ्यातील अशा स्मारकांची स्वच्छता करण्याचा निर्धार युवक धर्मप्रेमींनी केला.

धुळे येथे आयोजित हिंदु एकता दिंडी यशस्वी करण्याचा हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा निर्धार !

हिंदु एकता दिंडीच्या नियोजन बैठकीला उपस्थित समितीचे साधक आणि धर्माभिमानी

धुळे : सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण भारतात २८ एप्रिल ते २८ मे २०१८ या कालावधीत ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ मोठ्या उत्साहात चालू आहे. या अभियानाचा मूळ उद्देश ‘समस्त हिंदूंचे हक्काचे हिंदु राष्ट्र निर्माण व्हावे अखंड मानवजातीचे कल्याण व्हावे’, असा आहे. या अभियानाच्या अंतर्गत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालणे, साधनापर प्रवचन घेणे, शौर्य जागरणचे कार्यक्रम घेणे, हिंदु राष्ट्रजागृती सभा घेणे, मंदिरांची स्वच्छता करणे आणि हिंदूंच्या ऐक्यासाठी हिंदु एकता दिंडी काढणे, अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

याच अभियानाचा एक भाग म्हणून येत्या २० मे या दिवशी धुळ्यामध्ये सायंकाळी ५.३० च्या सुमारास ‘भव्य हिंदु एकता दिंडीचे’ आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीची प्रथम बैठक आग्रा रोड येथील नृसिह मंदिरात पार पडली.

दिंडी प्रकाश टॉकीज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून आरंभ होऊन आग्रा रोड येथील श्रीराम मंदिर येथे सांगता होईल. ही दिंडी संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने होईल. यात विविध चित्ररथ, देखावे, सांस्कृतिक पथके असतील. तरी ‘या दिंडीमध्ये सर्व हिंदु बांधवांनी आपला संप्रदाय, संघटना बाजूला ठेवून एक ‘हिंदु’ म्हणून या दिंडीत सहभागी होऊया’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. त्याचप्रमाणे ही दिंडी यशस्वी व्हावी आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी देवाला साकडेही घालण्यात आले.

वाडीभोकर गोंदुर (धुळे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागरण शिबीर उत्साहात !

धुळे : येथील ज्ञानेश्‍वर माऊली पाठशाळा आयोजित आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितिच्या वतीने शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानवीलकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात ‘शौर्य जागृत करण्याची आवश्यकता आणि हिंदु धर्मातील संस्कृतीचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले. शिबिराच्या दुसर्‍या सत्रामध्ये स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील युवकांनी कराटे, लाठी आणि दंडसाखळी चालवण्याची प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थित मुलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन अशा प्रकारचे प्रशिक्षण नियमित मिळण्याविषयी विचारणा केली.

ज्ञानेश्‍वर माऊली पाठशाळेचे श्री. सुदर्शन महाराज यांनी सुद्धा शौर्य जागरण शिबिराप्रमाणे नियमित स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली, तर प्रकाश महाराजांनी ‘मुलांसमवेत आम्हीसुद्धा प्रशिक्षणवर्गात सहभागी होऊ, ही काळाची आवश्यकता आहे’, असे सांगितले. या शिबिराचा लाभ ५१ शिबिरार्थींनी घेतला.

मिरज येथील प्रसिद्ध अंबामाता मंदिरात साकडे !

मिरज येथील अंबामाता मंदिरात साकडे घालतांना धर्मप्रेमी

मिरज येथील ब्राह्मणपुरी येथील प्रसिद्ध अंबामाता मंदिरात ८ मे या दिवशी देवीला साकडे घालण्यात आले. या वेळी १० धर्मप्रेमी उपस्थित होते. वाळवे गल्ली येथील श्रीदुर्गामाता मंदिर येथे देवीला साकडे घालण्यात आले. या वेळी ५ वाचक आणि ११ धर्माभिमानी उपस्थित होते. जत येथे श्री यल्लामा देवीला साकडे घालण्यात आले. या वेळी ८ धर्मप्रेमी उपस्थित होते.

तुजारपूर (ईश्‍वरपूर) येथे युवतींसाठी शौर्यजागरण विषयावर अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ २५ युवतींनी घेतला.

सोलापूर येथे ‘माहिती अधिकार’ कार्यशाळा

सोलापूर येथील माहिती अधिकार कार्यशाळेला उपस्थित धर्मप्रेमी

सोलापूर : प्रचलीत व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखणे, तसेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील आघात रोखणे यांसाठी माहिती अधिकार हे प्रभावी शस्त्र आहे. या अधिकाराचा वापर केवळ राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे महाराष्ट्र अधिवक्ता संघटक आणि हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत सुराज्य अभियानाचे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. १३ मे या दिवशी येथील घोंगडे वस्ती मधील जुने दत्तमंदिर येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘माहिती अधिकार’ कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. या कार्यशाळेला ६० हून अधिक धर्मप्रेमी  उपस्थित होते. या वेळी अधिवक्ता सांगोलकर यांचे श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजकुमार पाटील यांनी श्रीफळ देऊन स्वागत केले; तर श्री. दत्तात्रेय पिसे यांनी सूत्रसंचालन केले.

अधिवक्ता सांगोलकर पुढे म्हणाले, ‘‘माहिती अधिकाराचा वापर सर्वसामान्य जनतेने व्यवस्थेतील दोष, उणिवा आणि अपप्रकार दूर होण्यासाठी केल्यास सुराज्य येण्यास वेळ लागणार नाही.’’ माहिती अधिकार कायद्यातील सर्व महत्त्वाच्या तरतुदींवर अधिवक्ता सांगोलकर यांनी उपस्थितांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले.

विशेष

१. अनेक धर्मप्रेमी शेजारील अन्य गावांतून कार्यशाळेला उपस्थित राहिले.

२. ‘‘माहिती अधिकाराच्या कायद्याविषयी पुष्कळ माहिती मिळाली. आम्ही या कायद्याचा सुराज्य येण्यासाठी उपयोग करणार’’, असे धर्माभिमान्यांनी या वेळी  सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *