सातारा : अतिक्रमणामध्ये मंदिरे असल्याचे कारण पुढे करत मध्यरात्री ३ वाजता माणच्या तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली तहसील विभाग, सार्वाजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने सातारा-पंढरपूर रस्त्याच्या कडेला असलेले रेणुकामाता मंदिर आणि खंडोबा मंदिर प्रशासनाने मध्यरात्रीत पाडल्याची धक्कादायक घटना घडली. याचे तीव्र पडसाद म्हसवडसह संपूर्ण जिल्ह्यात उमटले.
रेणुकामातेचे मंदिर हे अनधिकृत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. हे मंदिर प्रशासनाचे कर्मचारी पाडत असतांना तेथील जोगत्यांनी आत्मदहन करून घेण्याचा प्रयत्न केला. येथे काहीवेळ धक्काबुक्की झाली. या वेळी उपस्थित नायब तहसीलदार श्री. बाळासाहेब शिरसट यांना हणमंत दौंडे यांनी धक्काबुक्की केल्याने त्यांच्या मांडीचा अस्थीभंग झाला.
या वेळी कारवाई करण्यात आलेले खंडोबा मंदिर मात्र पुरातन असल्याचे गावातील जुनी-जाणती मंडळी सांगतात. रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी ही मंदिरे गेली कित्येक वर्षांपासून प्रशासनाचे लक्ष्य बनली होती. खंडोबा मंदिरासाठी पर्यायी जागा देण्यासाठी ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात अनेक बैठका झाल्या. त्यामध्ये गावातीलच एका शौचालयापासून २५-३० फूट अंतरावर मंदिरासाठी जागा देण्याचे प्रशासनाने देण्याचे कबुल केले; मात्र शौचालयाजवळची जागा देवासाठी नको, या कारणासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला नकार दिला. या प्रकरणी फलटण संस्थानचे राजे आणि विधान परिषदेचे विद्यमान सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी म्हसवड येथे त्यांच्या शाळेच्या मैदानावर खंडोबा मंदिरसाठी १० x १० ची जागा देतो, असे सांगून ग्रामस्थ आणि प्रशासनातील वाद मिटवला; मात्र प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता २७ फेब्रुवारी, या दिवशी मध्यरात्री ३ वाजता खंडोबा मंदिर पाडण्यास प्रारंभ करून श्रीखंडोबा भक्तांचा विश्वासघात केला. यामुळे म्हसवड नगरीत संपूर्ण दिवसभर तणावपूर्ण शांतता जाणवत होती. शेकडो वर्षांपूर्वीचा हा खंडोबाचा चौथर्यात सुधारणा करून भाविकांकडून त्याला मंदिराचे स्वरूप देण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात