‘चीनमध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जातात’, असे चीनमधील कोणीही म्हणत नाही, हे लक्षात घ्या !
बीजिंग : चीनने देशातील शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांना सुशिक्षित करण्यासाठी शिजजियांग प्रांतात नव्याने केंद्र चालू केले आहे. यात अनेकांना बलपूर्वक पकडून आणण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या केंद्रात रहात असलेल्या दोघा मुसलमान व्यक्तींनी चीनकडून होणार्या कथित अत्याचाराविषयीची माहिती उघड केली आहे. उमर बेकाली आणि कायरत समरकंद अशी त्यांची नावे असून त्यांनी ही माहिती सांगितली. शिनजियांग प्रांताची लोकसंख्या २ कोटी १० लाख असून यामध्ये जवळपास १ कोटी १० लाख उघूर वंशाचे मुसलमान आहेत. ज्या मुसलमानांना या केंद्रात आणण्यात आले आहे, त्यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे.
समरकंद याने या केंद्रातील छळवणुकीविषयी पुढीलप्रमाणे माहिती सांगितली
१. माझी चूक एवढीच होती की, मी मुसलमान आहे आणि शेजारी देश कझाकिस्तानमध्ये गेलो होतो. केवळ याच आधारे मला कह्यात घेऊन माझी ३ दिवस चौकशी करण्यात आली. यानंतर मला शिनजियांग येथे ३ मासांसाठी शिक्षण केंद्रात पाठवण्यात आले.
२. शिक्षण केंद्रात पाठवण्यात आल्यावर माझा ‘ब्रेनवॉश’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिवसभरात अनेक घंटे बलपूर्वक साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाची विचारसरणी, धोरण वाचायला लावण्यात आले. प्रत्येक दिवशी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना धन्यवाद देणार्या आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार्या घोषणा देण्यास सांगण्यात आल्या.
३. जे कोणी नियमांचे पालन करत नव्हते किंवा करण्यास नकार देत असत, वाद घालत किंवा शिकवण्यासाठी उशिरा येत त्यांना तब्बल १२ घंटे हात पाय बांधून कोंडून ठेवले जात असे. या व्यतिरिक्त तोंड पाण्यात बुडवले जात असे.
४. करामे गावातील एकाच केंद्रात ५ सहस्र ७०० लोकांना बंदी करून ठेवण्यात आले आहे. यातील २०० जण धार्मिक आतंकवादाला खतपाणी घातल्याच्या आरोपाखाली संशयित आहेत. येथे अनेकांनी छळ असह्य झाल्याने आत्महत्या केल्या आहेत.
उमर बेकाली याने दिलेली माहिती
उमर बेकाली याने सांगितले की, येथे अत्यंत निकृष्ट अन्न दिले जाते. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची खूप शक्यता असते. येथे रहाणार्या अनेकांना शिक्षा म्हणून डुकराचे मांस खाण्याची सक्ती केली जाते. तसेच धार्मिक आतंकवादाच्या आरोपाखाली दारूदेखील पाजली जाते. बेकाली हा मूळचा कझाकिस्तानचा आहे. तो शिनजियांग प्रांतात पर्यटन आस्थापनात काम करत होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात