Menu Close

‘सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या वस्तूखरेदीत ६६ लक्ष ५५ सहस्र रुपयांचा महाघोटाळा’

हिंदु विधीज्ञ परिषदेकडून मुंबई आणि पुणे येथील पत्रकार परिषदांमधून शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे धक्कादायक वास्तव उघड !

मंदिरातील धनाच्या रक्षणासाठी संविधानिक मार्गाने लढा देण्याची हिंदु विधीज्ञ परिषदेची चेतावणी

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! कुठे धर्मप्रसार होण्यासाठी मंदिरांना दानधर्म करणारे पूर्वीचे राजे, तर कुठे मंदिरातीलच भाविकांचा निधी लुटून नेणारे सध्याचे भ्रष्ट राजकारणी !

पोलिसांसाठीच्या सुरक्षा साहित्याची प्रचंड दराने खरेदी खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी : सिंहस्थ कुंभमेळा होऊन ३ वर्षे उलटली, तरी साहित्य अद्याप संस्थानकडे परत आले नाही !

डावीकडून सौ. सुनीता पाटील, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. सतीश कोचरेकर

मुंबई, २४ मे (वार्ता.) – शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने वर्ष २०१५ च्या नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीच्या नियोजनासाठी पोलिसांच्या मागणीनुसार सुरक्षा साहित्य खरेदी केले. हे साहित्य चढ्या दराने खरेदी करून त्यामध्ये ६६ लक्ष ५५ सहस्र ९९७ रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, तसेच शिर्डी संस्थानच्या निधीतून नगर जिल्ह्यातील निळवंडे धरण आणि कालवा प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ‘काँग्रेस शासनाच्या काळातील ७० सहस्र कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील दोषींना कारागृहात घालून त्यांच्याकडून रक्कम वसूल करू’, अशी घोषणा करणार्‍या भाजपने अद्याप ना पैसे वसूल केले, ना दोषींवर कारवाई केली. उलट काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत पैसा नाही; म्हणून भक्तांच्या तिजोरीत हात घालायचा, हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मंदिरातील धनाच्या रक्षणासाठी आम्ही संविधानिक मार्गाने लढा देऊ, अशी चेतावणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ मे या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर आणि सनातन संस्थेच्या सौ. सुनीता पाटील उपस्थित होत्या.

पत्रकार परिषदेत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर पुढे म्हणाले, ‘‘भाजपने वर्ष २०१६-१७ मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ‘बॅलन्सशीट’मध्ये भाजपची आवक १५ सहस्र २८ कोटी रुपये इतकी आहे. भाजपला जर समाजकार्य करायचे असेल, तर त्यांनी स्वत:च्या पक्षाचा पैसा व्यय करावा. पक्षाचा पैसा व्यय न करता मंदिरातील धनाला हात लावण्याचा त्यांना काय अधिकार आहे ? अशा प्रकारे भाजप काँग्रेसच्या पावलावरच पाऊल ठेवत आहे.’’

माहिती अधिकारात उघड झालेली धक्कादायक माहिती

१. नगर पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या अंदाजित दरांपेक्षा पोलिसांसाठीचे सुरक्षासाहित्य प्रचंड चढ्या दराने खरेदी केले, उदा. ६० सहस्र रुपयांचा मनीला रोप (दोर) (१० सहस्र मीटर लांबीचा) १८ लक्ष ५० सहस्र रुपयांना, ४०० रुपये प्रती नग ‘रिचार्जेबल टॉर्चेस’(विजेरी) प्रती नग ३ सहस्र रुपयांना, २ सहस्र रुपयांचा ‘साईन बोर्ड’ ९ सहस्र २०० रुपयांना, तर ५ सहस्र रुपयांची ताडपत्री २२ सहस्र ५७५ रुपयांना, अशा प्रकारे ६६ लक्ष ५५ सहस्र ९९७ रुपयांची अनावश्यक उधळपट्टी करण्यात आली. (वैयक्तिक कारणासाठी वस्तू खरेदी करावी लागली, तर संस्थानचे कारभारी ती तिप्पट ते साडेपाच पट दराने खरेदी करतील का ? मंदिरामध्ये भाविकांना दिलेल्या पैशांवर डल्ला मारण्यामागे संघटित टोळीच कार्यरत असणार, हे स्पष्ट आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. वर्ष २०१५ मध्ये सिंहस्थाच्या काळात शिर्डी पोलिसांकडे सोपवलेल्या वस्तू अजूनही संस्थानने स्वतःकडे जमा करून घेतलेल्या नाहीत. ताडपत्री, दोर आदी वस्तूंच्या वापराविषयी ना शिर्डी संस्थानाने अहवाल मागवला, ना पोलिसांनी तो दिला. माहिती अधिकारात वस्तू वापराविषयी प्रश्‍न केल्यावर ‘या वस्तूंचा वापर २०१८ मध्ये होणार्‍या ‘साई महासमाधी शताब्दी सोहळ्या’साठी होईल’, असे साई संस्थानाने कारण दिले आहे. वर्ष २०१५ मध्ये खरेदी केलेल्या वस्तू वर्ष २०१८ मध्ये वापरायच्या, हा व्यवहार नसून हा उघड भ्रष्टाचार आहे. या गोष्टी केवळ कागदोपत्रीच दाखवल्याची शक्यता नाकारता येत नाही. (श्री साईबाबा संस्थानाच्या बेहिशेबी कारभारावर शासनाचे नियंत्रण नाही, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. या प्रकरणी १६ डिसेंबर २०१६ या दिवशी महाराष्ट्र सरकारने पत्र पाठवून स्पष्टीकरण मागवले; मात्र दीड वर्ष उलटूनही संस्थानने या पत्राचे उत्तर दिलेले नाही. (सरकारी पत्राला केराची टोपली दाखवण्याच्या वृत्तीतूनच पदाधिकार्‍यांचा मनमानीपणा आणि उद्दामपणा, तसेच सरकारची पाट्याटाकू वृत्ती दिसून येते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

सुरक्षासाहित्यामध्ये वातानुकूलित यंत्रांचाही समावेश

पोलिसांसाठीच्या सुरक्षासाहित्यामध्ये संगणक, प्रिंटर, रिसोग्राफर आणि २ वातानुकूलित यंत्रे यांचाही समावेश आहे.

सिंहस्थासाठी खरेदी करत असल्याचे सांगून वस्तूंची खरेदी मात्र सिंहस्थ संपल्यानंतर करण्याचा प्रकार !

शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात कुंभमेळा संपल्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये ‘वायरलेस टॉवर’ बांधण्यात आला. प्रिंटर, संगणक, झेरॉक्स यंत्र, २०० वाहतूक पोलिसांसाठी ‘बॅटरी स्टिक’ यांसह बरेच साहित्य हे शिर्डी संस्थानने ११ सप्टेंबर २०१५ या दिवशी म्हणजेच कुंभमेळा संपल्यावर घेण्यास शिर्डी पोलीस ठाण्यास कळवले होतेे. कुंभमेळा संपल्यावर हे साहित्य घेऊन पोलिसांनी त्याचे काय केले ? पावसाळा संपल्यानंतर म्हणजे २१ सप्टेंबर २०१५ या दिवशी रेनकोट मिळाले. पोलिसांना त्यांच्या मागणीव्यतिरिक्त दिलेले ३०० लोखंडी बॅरिकेट्स संस्थानला परत मिळाले का ? या बॅरिकेट्सचा व्यय कोणत्या अधिकारात करण्यात आला, यांसह अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत, असे हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पुणे येथील पत्रकार परिषद

महाघोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर त्वरित आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून अधिवक्ता मोहनराव डोंगरे, श्री. सुनील घनवट, श्री. पराग गोखलेम

पुणे – ‘श्रद्धा आणि सबुरी’ ही शिर्डीच्या साईबाबांची शिकवण आहे; मात्र साईबाबांच्या या आध्यात्मिक शिकवणीचा राजकारण्यांनी मंदिराचे सरकारीकरण करून केवळ व्यावहारिक दृष्टीने अपलाभ घेतला. लोकप्रतिनिधींची श्रद्धा साईंवर नाही, तर साईचरणी अर्पण होणार्‍या पैशावर असल्याचे आणि हा भ्रष्ट कारभार पुराव्यासहित उघडकीस येऊनही ‘सबुरी’ने घेण्याचे लोकप्रतिनिधींनी ठरवले असल्याचे चित्र आहे. त्याचे प्रमाण म्हणजे हिंदु विधीज्ञ परिषदेने माहितीच्या अधिकारात मिळवलेली माहिती होय. ‘वर्ष २०१५ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट’ने पोलिसांच्या मागणीनुसार सुरक्षासाहित्य खरेदी केले; मात्र ते अंदाजित दरांपेक्षा प्रचंड चढ्या दराने खरेदी केले गेले असून सकृतदर्शनी त्यात ६६ लक्ष ५५ सहस्र ९९७ रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिसून येते. हे केवळ हिमनगाचे टोक असून या घोटाळ्याची व्याप्ती अनेक पट असू शकते. या खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना त्वरित आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. (हा महाघोटाळा म्हणजे भ्रष्टाचारमुक्त नाही, तर भ्रष्टाचारयुक्त भारताच्या दिशेने होणारी वाटचालच होय ! मंदिरांऐवजी राजकीय पक्षांचे धन निवडणुकांचा व्यय आणि अन्य समाजकार्य यांसाठी का वापरले जाऊ नये ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथील पत्रकार संघात २४ मे या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी अधिवक्ता मोहनराव डोंगरे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले हेही उपस्थित होते.

शिर्डी संस्थानाच्या निधीतून ‘निळवंडे धरण-कालवा’ प्रकल्पासाठी दिलेल्या ५०० कोटी रुपयांची चौकशी करा ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

गेली ४५ वर्षे रेंगाळलेल्या नगर जिल्ह्यातील ‘निळवंडे धरण आणि कालवा’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी शिर्डी संस्थानाच्या निधीमधून ५०० कोटी रुपये संमत केले. निळवंडे धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात शिर्डी गाव येत नसूनही ‘श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी) कायदा २००४’चा भंग करून हा निधी का देण्यात येत आहे, याचे उत्तर मिळायला हवे. वास्तविक शासन आणि अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे या कालव्याचे काम रेंगाळले आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि शिर्डी मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कालव्यासाठी पैसे मागायचे आणि मुख्यमंत्र्यांनी ते संस्थानच्या वतीने देण्याचे घोषित करायचे, हा कुठला प्रकार आहे ? जलसिंचन घोटाळ्यांतील दोषींना शिक्षा करायचे सोडून त्यांना अभय द्यायचे आणि राजकीय साटेलोटे साधून भक्तांचा पैसा लुटायचा, असाच भाजप सरकारचा कारभार यातून दिसून येतो.

संस्थानकडून न्यायालयाची दिशाभूल ! – अधिवक्ता मोहनराव डोंगरे

या संदर्भात दिलेल्या वस्तूंचा ४ आठवड्यांत तपशील सादर करण्याचा आदेश न्यायालयाने देऊनही त्यासंदर्भात संस्थानने काही कारवाई केली नाही. खरेदी प्रक्रियाही लेखी अनुमती न घेता आणि अपारदर्शकपणे राबवली. याला संस्थानचे पदाधिकारीच उत्तरदायी आहेत. संस्थानकडून न्यायालयाचीही दिशाभूल झाली आहे.

‘फेसबूक’च्या माध्यमातून ३ सहस्र जणांपर्यंत पत्रकार परिषद पोहोचली !

या पत्रकार परिषदेचे ‘फेसबूक’वरून थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे ३ सहस्रांहून अधिक जणांपर्यंत विषय पोहोचला. ९६३ जणांनी पत्रकार परिषद ‘लाईव्ह’ पाहिली. ११० जणांनी हे प्रक्षेपण इतरांना ‘शेअर’ केले.

क्षणचित्र : पत्रकार परिषदेला वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांचे २५ प्रतिनिधी उपस्थित होते. ‘महाराष्ट्र दर्पण टीव्ही न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीने पत्रकार परिषदेचे ‘फेसबूक’वरून ‘लाईव्ह’ प्रक्षेपण केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *