मुंबई : कन्हैया म्हणजे टोपीवाला उंदीर असे म्हणत जेएनयूत कन्हैयाकुमारने दिलेल्या भाषणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी टीका केली.
संघाने प्रतिक्रिया द्यावी इतके कन्हैयाचे भाषण मोठे नाही असेही वैद्य म्हणाले. त्यामुळे आमच्या प्रतिक्रियेपेक्षा न्यायालयाने कन्हैयाविषयी जे मत नोंदवले आहे ते अधिक गंभीर असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले.
कन्हैयाच्या भाषणावर संघाचे प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य म्हणाले कि,
कन्हैयाचे भाषण संघाने प्रतिक्रिया देण्यासारखे नाही. मात्र, मी जेव्हा दुसऱ्या वर्गात होतो तेव्हा मला एक धडा होता. एका उंदराला एक सुंदर टोपी मिळाली ज्यावर एक गोंडा होता.त्या उंदराने ती टोपी घातली आणि बाजारात दिमाखात फिरू लागला. त्याचवेळी ओरडूही लागला की माझ्या टोपीसारखी टोपी तर राजाकडेही नाही. ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. राजाने सैनिकांकरवी त्याला पकडून दरबारात आणले. त्यावरही उंदराने आपले हेच म्हणणे कायम ठेवले. राजाने त्याची टोपी काढून घेतली. तर उंदीर ओरडायला लागला की राजा भिकारी माझी टोपी घेतली. मग राजाने त्याची टोपी त्याला परत केली. त्यावर उंदीर ओरडू लागला की राजा मला घाबरला माझी टोपी दिली मला. या कम्युनिस्टांचे असेच असते.
मला तेव्हा कळले नव्हते की या धड्याचा अर्थ काय असतो. आज संघ यावर काय प्रतिक्रिया देतो त्यापेक्षा कोर्टाने कन्हैयावर काय ताशेरे ओढले ते अत्यंत गंभीर आहे. त्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
संदर्भ : एबीपी माझा