साधनेची जोड देऊन दोष निवारण केल्यासच उत्तम हिंदूसंघटक होता येईल ! – सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती
नगर : समाजात हिंदुत्वाचे कार्य करत असतांना त्याला साधनेची जोड देऊन स्वत:तील दोष निवारण केल्यासच आपण उत्तम हिंदूसंघटक होऊ शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत ते बोलत होते. नगर जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना दिशा मिळण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला नगर जिल्ह्यातील विविध गावांतून २४ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
कार्यशाळेचा आरंभ शंखनाद करून करण्यात आला. प्रथम सत्रात कार्यशाळेचा उद्देश कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी विशद केला. ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर कु. प्रियांका लोणे यांनी, तर ‘हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना’ याविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले. हिंदूसंघटन प्रभावी होण्यासाठी राबवू शकणार्या उपक्रमांची माहिती श्री. अरूण ठाणगे आणि कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी दिली. नंतर हिंदुत्वाचे प्रत्यक्ष कार्य करत असतांना येणार्या समस्या जाणून घेण्यासाठी काही प्रायोगिक भाग घेण्यात आले. यामध्ये पोलिसांना तक्रार कशी द्यावी, तसेच समाजात हिंदु राष्ट्राचा विषय कसा मांडावा, याविषयी प्रायोगिक भाग घेण्यात आला. गटचर्चेत धर्मप्रेमींनी त्यांच्या भागात हिंदुत्वाचे कार्य पुढे नेण्याच्या उद्देशाने धर्मशिक्षण वर्ग, शौर्य जागरण शिबीर आणि छोट्या धर्मजागृती सभा घेण्याचे निश्चित केले. हिंदुत्वाचे कार्य प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र संघटकांची आचारसंहिता काय असावी, कोणत्या चुकीच्या सवयी आणि दृष्टीकोन टाळावेत, याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. नंतर याच विषयाला अनुसरून स्वत:तील स्वभावदोष कोणते, ते कसे शोधावेत आणि त्यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया कशी राबवावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. चैताली डुबे यांनी केले.
क्षणचित्रे
१. शिबिराच्या शेवटच्या सत्रात मढी देवस्थानचे विश्वस्त आणि पत्रकार श्री. मिलिंद चवंडके उपस्थित होते.
२. दुपारच्या सत्रातील प्रायोगिक भागात सहभागी झालेल्या धर्मप्रेमींनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले.
३. कार्यशाळेसाठी श्री. राजू जोशी (बन्सी महाराज) यांनी अल्पाहार, तर श्री. विनोद काशीद यांनी भोजन व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली.
४. कार्यशाळेसाठी श्री. संजय कपाले यांनी शुभ मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले.