वर्धा : कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कारांच्या घटनांनंतर देशभरात प्रचंड संताप व्यक्त होत आंदोलने झाली. यावर केंद्रशासनाने बलात्काराशी संबंधित कायद्यात मोठा पालट करत ११ वर्षांखालील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याला फाशीची शिक्षा देण्याचा अध्यादेश पारीत केला. तरी उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील मदरशामध्ये ११ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीवर धर्मांध मौलवी आणि अल्पवयीन मुलाने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होण्यामागे अनेक घटकांपैकी एक मुख्य घटक म्हणजे अश्लील संकेतस्थळे (पॉर्न साईट) पहाणे. याद्वारे लैंगिक भावना उद्दिपित होऊन बलात्काराच्या घटना घडत असल्याची असंख्य उदाहरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यामुळे अशा अश्लील संकेतस्थळांवर पूर्णत: बंदी घालणे आवश्यक आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथील जिल्हाधिकारी शैलेश नावल यांना अधीक्षकांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करा, याविषयीची मागणीही या निवेदनाच्या माध्मातून करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.