बेळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ७ मे २०१८ या दिवशी वयाची ७६ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत २७ मे या दिवशी येथे हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विविध संप्रदाय यांच्या वतीने मार्कंडेय नदीच्या किनार्यावर वसलेल्या बेळगाव येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर योग वेदांत समितीचे श्री. अमर चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्याचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सक्रीयरित्या सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या दिंडीत शहर आणि परिसर यांतील विविध संघटनांनी उस्फूर्त सहभाग घेतला होता.
अशी झाली दिंडी
१. योग वेदांत समितीचे श्री. अमर चौधरी यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पू. वासुदेव पुरुषोत्तम गिंडे महाराज आणि सनातनचे संत पू. शंकर गुंजेकर यांनी ग्रामदेवता श्री महालक्ष्मी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
२. सनातनचे श्री. यल्लापा पाटील आणि श्री. गणेशभाई यांनी शंखनाद करून दिंडीचा उद्देश सांगितला. त्यानंतर भावपूर्ण वातावरणात दिंडीला प्रारंभ झाला.
३. दिंडीच्या प्रारंभापासून ते शेवटपर्यंत ‘रायबाग तायक्वांदो सेंटर’ या संस्थेतील मुलांनी कराटेची प्रात्यक्षिके आणि श्री शिवसम्राट युवक मंडळातील कार्यकर्त्यांनी लाठीकाठी, दंडसाखळी, दांडपट्टा यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकून घेतली. दिंडीत शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
४. दिंडीत हिंदुत्वनिष्ठ आणि रणरागिणी यांनी भगवे वस्त्र घालून हातात भगवे झेंडे घेतल्यामुळे बेळगाव शहर भगवेमय झाल्याने दिंडीच्या मार्गावरून जाणार्यांनी मोठ्या आपुलकीने दिंडीचा उद्देश विचारला, तसेच २ पालखीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला आणि ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यांच्या प्रतिमेस भावपूर्ण नमस्कार केला.
क्षणचित्रे
१. दिंडीच्या आदल्या दिवशी मोठा पाऊस झाला होता. जणू या दिंडीच्या निमित्ताने वरुण देवानेही उपस्थिती दर्शवून सर्वांना आशीर्वाद दिला.
२. दिंडीत आलेल्या एका श्वानाला बाजूला केले तरी तो पुन्हा पुन्हा दिंडीत येत होता.
३. दिंडीच्या मार्गावर महिलांचे गजरे विकणारे श्री. माने यांनी दिंडीतील महिलांना विनामूल्य गजरे दिले. तसेच पालखी आणि प्रतिमेला हार अर्पण केले.
४. दिंडीच्या प्रारंभापासून अखंडपणे झांजपथक, लेझीम, प्रात्यक्षिके, वारकरी संप्रदायाची भजने चालू होती. हे आणि फुलांनी सजवलेला रथ पाहून धर्मप्रेमी भारावून गेले.
५. अनेक जण भ्रमणभाषमधून छायाचित्रे काढत होते, तर अनेक लोकांनी दिंडी काढण्याचा उद्देश विचारून घेतला.
६. बालसाधकांनी दिलेल्या घोषणा ऐकून घरातील लहान मुलांनी तशाच घोषणा दिल्या
७. दिंडी पाहून शेकडो लोकांनी दोन्ही पालख्यांना उत्स्फूर्तपणे नमस्कार केला.
८. रस्त्यावरील, घरातील धर्मप्रेमी आणि जिज्ञासू दिंडीत लावण्यात आलेले भक्तीगीत टाळ्या वाजवून स्वतः म्हणत होते.
९. दिंडीत महिलांनी फुगड्या घातल्या.