यवतमाळ : ‘देवता या आपल्या जीवनामध्ये सर्वांत श्रेष्ठ आहेत; परंतु भारतासह विदेशात मोठ्या प्रमाणात देवतांची विटंबना होत आहे. हे थांबले पाहिजे. त्यासाठी कठोर कायदा निर्माण व्हावा, यासाठी कायद्यामध्ये पालट करण्याचा प्रयत्न करू’, असे आश्वासन शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यांनी दिले. त्या हिंदु जनजागृती समितीप्रणीत राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होत्या.
अश्लील संकेतस्थळावर बंदी आणावी आणि नाटके, चित्रपट, विज्ञापने यांद्वारे होणार्या हिंदूंच्या देवता, संत यांची विटंबना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, यासाठी यवतमाळ येथील दत्त चौक येथे २५ मे या दिवशी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले.
या आंदोलांमध्ये शिवसेनेसह हिंदू महासभा, योग वेदांत समिती, महिला उत्थान मंडळ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे ५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाला ३०० हून अधिक जिज्ञासूंनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दिला. गोपनीय शाखेच्या अधिकार्यांनी या आंदोलनाचे चित्रीकरण केले. (यापेक्षा आतंकवाद्यांना शोधण्यासाठी वेळ आणि शक्ती वापरली असती, तर त्याचा उपयोग तरी झाला असता ! – संपादक, हिंदुजागृती)
हिंदूंच्या प्रश्नासाठी लोकसभेत माझा आवाज बुलंद राहील ! – खासदार भावनाताई गवळी
या वेळी भावनाताई म्हणाल्या ‘‘महिला आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे असून चालत नाही, तर त्यासाठी समाजाची मानसिकताही पालटावी लागेल, संस्कार निर्माण करावे लागतील. संस्कार निर्माण होण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आंदोलन करत आहे. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करते. जेव्हा जेव्हा सनातन संस्थेला आवश्यकता भासेल, तेव्हा शिवसेना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. ज्या ज्या वेळी हिंदूंचा प्रश्न निर्माण होईल, त्या वेळी मी माझा आवाज लोकसभेमध्ये बुलंद करीन. आमचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे.’’
क्षणचित्र : महिला उत्थान मंडळाच्या महिलांनी आंदोलनाला स्वाक्षरी मिळवण्यासाठी रस्त्याने जाणार्या नागरिकांचे प्रबोधन केले.