‘हिंदुत्वा’च्या आधारे हिंदू संघटित झाल्याविना देशाचा विकास अशक्य ! – अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी
बेळगाव : हिंदुत्व नष्ट झाल्यामुळे आज भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वीचे शास्त्र, वेद, उपनिषद मानून त्यावर विश्वास ठेवून जे हिंदू कार्य करतात, त्याला ‘हिंदुत्व’ असे म्हणतात. असे हिंदू संघटित झाल्याविना देशाचा विकास होणार नाही. आध्यात्मिक पद्धतीने लोक चांगले काम करतात. त्यामुळे स्वतःचा विकास करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन असे काम केले पाहिजे. या अनुषंगानेच गोवा राज्यातील रामनाथी येथे २ जूनपासून ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’स प्रारंभ होणार आहे. याचा लाभ पत्रकारांसह सर्व हिंदुत्वनिष्ठांनी घ्यावा, असे आवाहन अधिवक्ता श्री. शरदचंद्र मुंदरगी यांनी येथे २८ मे या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्याचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा, सनातन संस्थेच्या जिल्हासेविका सौ. उज्ज्वला गावडे आणि हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. अंजेश कणंगलेकर उपस्थित होते.
श्री. गुरुप्रसाद गौडा म्हणाले की, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित केले आहे. राष्ट्र आणि धर्माच्या विविध समस्यांसह युवा संघटन, संतसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. या वेळी सौ. उज्ज्वला गावडे यांनी ‘अधिवेशनाचा उद्देश समाजात पोहोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे’, असे सांगितले.
अधिवक्ता श्री. शरदचंद्र मुंदरगी म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी मी या अधिवेशनात २ दिवस भाग घेतला होता, तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. अधिवेशनात ‘देशाची प्रगती होऊन समस्त मानवजातीचे कल्याण व्हावे’, असेच चिंतन मांडून ते होण्यासाठी हिंदूंना संघटित करणे का आवश्यक आहे, हे सांगितले जाते. येथे पक्षभेद नाही. अधिवेशनामुळे मनुष्याला तृप्ती मिळते. माझ्याप्रमाणे पत्रकारांनीही वेळ काढून अधिवेशनाचा लाभ घ्यावा.’’