नंदुरबार : मनूने जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशशास्त्र आहे. मनूच्या सावलीला उभे रहाण्याचीही आपली लायकी नाही. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा म्हणजे निवळ नालायकपणा आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड आहे. अवघ्या ब्रह्मांडाला कह्यात घेण्याची शक्ती हिंदु धर्मात आहे, असे उद्गार श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी काढले. नंदुरबार येथे सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित धर्मसभेत ते बोलत होते.
पाकिस्तान आणि चीन यांसारख्या शत्रूदेशांविरोधात एकजुटीने उभे रहाण्याची आवश्यकता आहे; पण तसे होत नाही. पाकिस्तानच्या गोळीबारात एकीकडे भारतीय सैनिक हुतात्मा होत असतांना दुसरीकडे आपण पाकशी क्रिकेटचे सामने खेळतो, त्यांना सणासुदीला मिठाई देतो, हे चुकीचे आहे. चीनने आपल्यावर वर्ष १९६२ मध्ये युद्ध लादले. त्यात सहस्रो सैनिक हुतात्मा झाले. असे असतांनाही आताची तरुण पिढी ‘चायनीज फूड’ चवीने खाते ?, असा संतापही पू. भिडेगुरुजी यांनी व्यक्त केला.
कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर या सभेला अनुमती देऊ नये, यासाठी दोन दिवस भारतीय रिपब्लिकन संघटनेने आंदोलन केले होते. प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. शस्त्राचा उपयोग केवळ भांडणासाठी वापरणार्यांना मातृभूमीविषयीचे कर्तव्य कळत नाही. ४० सहस्र रोहिंग्या मुसलमान भारतात येतात; मात्र कोणाला राग येत नाही आणि लाज वाटत नाही. ‘आम्ही तलवार घेऊन रायगडावर जातो’, असे म्हटले, तर लगेच ‘संविधान बचाओ’चा नारा देत वाहिन्यांवर गळे काढायला आरंभ केला.
२. भारत हा जगातील सर्वांत संपन्न देश आहे. जपान, चीन, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, तुर्कस्थान, नेपाळ, इराण, इराक, अफगाणिस्तान, अरबस्थान हा सर्व भाग भारतखंडाचा भाग होता. त्यांतील बराच भाग गळाला. तरीही भारत जगात लक्षावधी एकर सुपीक भूमी असलेला, मोठ्या संख्येने नद्या असलेला, पशूधन, जलसंपदा असलेला, तसेच बुद्धीसंपन्न लोकांचा असा एकमेव देश आहे. जगातील सर्व शास्त्रांचा जन्म भारतात झाला आहे; मात्र आपणच करंटे आहोत. मातृभूमीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव आपल्याला नाही. आपल्याला परदेशाचे आकर्षण वाटते. ‘नासा’सारख्या संघटनेत ११ पैकी १० भारतीय आहेत. ‘जिनिव्हा’सारख्या छोट्या देशात अणूभट्टीचे संचालन करणार्यांत ५३ टक्के भारतीय आहेत. संगणकक्षेत्रातही ३७ टक्के भारतीय आहेत.
३. जगातील ७६ देशांनी हिंदुस्थानवर आक्रमणे केली; कारण हिंदूंच्या रक्तात आपण कोण आहोत ? कशासाठी जगायचे ? कशासाठी मरायचे ? आपला शत्रू कोण ? मित्र कोण ? याची जाणीवच नाही आणि त्याची त्यांना लाजही वाटत नाही.
राष्ट्र आणि धर्म यांप्रती निष्क्रीय असलेला हिंदु राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीकोनातून नपुंसक ठरतो !
देशातील हिंदु स्त्री-पुरुष राष्ट्रीयत्वाच्या कसोटीवर अनुत्तीर्ण आहेत. आपली धरती, परंपरा, संस्कृती, भाषा, धर्म यांविषयीची टोकाची क्रियाशीलता हिंदूंच्या रक्तात आढळत नाही. हिंदूंना स्वार्थापलीकडे काही कळत नाही. ही उणीव दूर केल्याशिवाय आपण राष्ट्र म्हणून उभे राहू शकणार नाही. राष्ट्र आणि धर्म यांप्रती क्रियाशीलता शून्य असलेला हिंदु राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीकोनातून नपुंसक ठरतो, असे उद्गारही पू. भिडेगुरुजींनी उद्विग्नतेने काढले.