३० देशांचे मुत्सद्दी सहभागी होणार !
३० देशांच्या मुत्सद्दींशी संवाद साधण्यासाठी इफ्तार मेजवानीचेच औचित्य का निवडले ? यातून काही साध्य होणार आहे का ? काँग्रेसप्रमाणे आता संघही लांगूलचालन करत आहे का, असा प्रश्न हिंदूंना पडल्यास चूक ते काय ? गेल्या ७० वर्षांच्या अनुभवातून संघ काही शिकला नाही, हेच यातून सिद्ध होतेे !
भाजप आणि रा.स्व. संघ यांना तथाकथित निधर्मी राजकीय विश्लेषकांकडून चपराक !
भाजपचा हा मुसलमानांची मते मिळवण्यासाठीचा डाव अयशस्वी ठरणार आहे. गोमांस बंदी आणि त्यावरून चालेला हिंसाचार, समान नागरी कायदा, आतंकवादाच्या नावाखाली मुसलमान तरुणांना लक्ष्य करणे, आदी सूत्रांमुळे मुसलमान समाजाशी नाळ जोडणे कठीण आहे, असे राजकीय विश्लेेषकांनी या संदर्भात म्हटले आहे.
मुंबई – ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’च्या वतीने रमझानच्या निमित्ताने ४ जून या दिवशी सह्याद्री अतिथीगृहात इफ्तार मेजवानीचे आयोजन केले आहे. यामध्ये ३० देशांचे मुत्सद्दी सहभागी होणार आहेत, तसेच मुसलमान समाजातील २०० प्रतिष्ठित व्यक्तींना या मेजवानीचे आमंत्रण आहे. यामध्ये इतर समुदायांतील १०० पाहुणेही सहभागी होण्याची शक्यता आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने अनेक देशांचे वाणिज्य दूतावास मुंबईत आहेत, तसेच मुस्लिम उद्योगपती आणि व्यापारी यांचे प्रमाणही येथे अधिक आहे. देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. चित्रपटक्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणारे मुसलमान कलाकारही शहरात मोठ्या संख्येने रहातात. इफ्तार मेजवानीच्या माध्यामातून या सर्वांशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक विराग पचपोरे यांनी सांगितले.
या आधी वर्ष २०१५ मध्ये इफ्तार मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेजवानीकरिता नकार दिला होता. अल्पसंख्यांक समाजामध्ये रा.स्व. संघाविषयी अपसमज आहेत. ते दूर करणे, हाच या इफ्तार मेजवानीचा हेतू असल्याचे पचपोरे यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात